मनोज जरांगे पाटील : देवेंद्र फडणवीसांचं स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही…

Photo of author

By Sandhya

मनोज जरांगे पाटील

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मला गुंतवायचं जे स्वप्न आहे ते मी पूर्ण होऊ देणार नाही, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

दरम्यान, २०१३ साली कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका फसवणुकीचा गुन्ह्यामध्ये नॉन बेलेबल वॉरंट पाटील यांच्या विरोधात जारी केलं होतं. याबाबत आज पुणे न्यायालयात सुनावणी झाली, यावेळी ते बोलत होते.

आज झालेल्या सुनावणीबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, आज उपोषणामुळे मला प्रचंड त्रास होत आहे. यामुळे आज मी न्यायालयात रुग्णवाहिकेत आलो आहे.

मला कायद्याचा संविधानाचा तसेच न्यायाधीशांचा सन्मान आहे, म्हणून मी आज रुग्णवाहिकेतून न्यायालयात हजर राहिलो आहे. मी न्यायालयाचा आदर करतो आणि करत राहणार आहे. न्यायालयाने जो काही निर्णय दिला आहे, त्या बाबत मी आत्ता काहीच बोलणार नाही.

तोपर्यंत शांत बसणार नाही – एकीकडे आपण रुग्णवाहिकेतून उपचार घेत आहे तर दुसरीकडे महाराष्ट्र दौरा आणि पुढील विधानसभा बाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, माझ्या तब्यतीला किंमत नसून समाजातील तरुणांना किंमत आहे. मी समाजासाठी रुग्णवाहिकेतून जाणार की कशातून जाणार? याला महत्त्व नाही.

माझा महाराष्ट्र दौरा 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान पूर्ण होणार आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण दिल्याशिवाय शांत राहणार नाही. मग माझ्या शरीराची परिस्थिती काहीही असो की सरकारचा कितीही विरोध असो, मी फडणवीस यांचं स्वप्न कधीच पूर्ण होऊ देणार नाही, असे यावेळी पाटील म्हणाले.

प्रकाश आंबेडकर आमच्या बाजूने लढतील – वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे ओबीसी आरक्षण बचावासाठी राज्यभर दौरा करत आहेत, त्याबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, प्रकाश आंबेडकर यांना आम्ही मानतो आणि मानत राहणार आहे. त्यांनी काय टीका करावी काय करू नये हा त्यांचा अधिकार आहे.

ते आमच्या बाजूने लढतील याची आम्हाला आशा असून आम्ही त्यांना मानतो, असं यावेळी पाटील म्हणाले. ते पुढे म्हणाले की ओबीसी आमचे विरोधक नाहीत आणि मी असं कधीचं म्हटलेलं नाही. ग्रामीण भागातील एकही दलित आदिवासी लोकांना बोललेलो नाही. ओबीसी नेते छगन भुजबळ हेच ओबीसी यांची वाट लावत असल्याचं यावेळी पाटील म्हणाले.

आगामी निवडणुकीबाबात काय म्हणाले पाटील – आगामी विधानसभाबाबत तिसऱ्या आघाडीबाबत पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, तिसऱ्या आघाडीची गरज नाही.

समाजाला न्याय द्यायचा आहे. गरिबांची लढाई लढायची आहे. मुख्यमंत्री म्हणून लागलेल्या बॅनर बाबत म्हणाले की, एखाद्या उत्साही कार्यकर्त्याने केलं असेल मला उभ राहायचं नाही. आम्ही गोरगरिबांना सत्तेत आणणार आहे, असेही यावेळी पाटील म्हणाले.

Leave a Comment

You cannot copy content of this page