भाजपाचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची काही दिवसांपूर्वी पुण्यातील बालेवाडी येथे सभा झाली होती. या सभेत अमित शाह यांनी शिवसेना उबाठा गटावर टीका केली होती.
उबाठा गटाने काँग्रेसच्या नादी लागू हिंदुत्व सोडलं, असे अमित शाह म्हणाले होते. आज शिवसेना उबाठा गटाची पुण्यात सभा पार पडली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. तसेच त्यांना अहमद शाह अब्दालीची उपमा दिली.
उद्धव ठाकरे म्हणाले, काही दिवसांपूर्वी पुण्यात भाजपाचा एक कार्यक्रम झाला. इतिहासात आपण डोकावलं, तर शाहिस्तेखान जरा तरी हुशार होता, असं म्हणावं लागेल. त्याचं बोटावर निभावलं.
तीन बोटं कापली गेल्यानंतर पुन्हा महाराष्ट्रात नाही आला. त्यातनं काही शहाणपण यांनी घेतले असते तर परत महाराष्ट्रात आले नसते, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षरित्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली.
“पण ते (अमित शाह) परत का आले? तर महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या फटक्यांचे वळ कुणाकुणाच्या अंगावर उमटले. हे पाहण्यासाठी ते आले. अहमदशाह अब्दालीचा राजकीय वंशज हा पुण्यात आला होता. तो अहमद शाह होता आणि हे अमित शाह आहेत. अहमद शाहचा राजकीय वशंच इथे वळवळायला आला होता.
नवाज शरीफचा केक खाणाऱ्यांकडून आता आम्ही हिंदुत्व शिकायचं का? शिवसेनेने हिंदुत्व सोडल्याचे हे म्हणाले. आम्ही हिंदुत्व सोडलेलं नाही. शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे विश्वासघातकी लोक हिंदू असू शकत नाही. तुम्ही आमच्याशी विश्वासघात केला”, असे टीकास्र उद्धव ठाकरेंनी सोडलं.
आम्ही काँग्रेसशी आघाडी केली तर हिंदू विरोधी होतो का? मग तुमचे राजकीय बाप श्यामाप्रसाद मुखर्जी मुस्लीम लीगबरोबर मांडीला मांडी लावून का बसले होते? जम्मू-काश्मीरमध्ये मेहबुबा मुफ्ती यांच्याबरोबर सरकार स्थापन केले होते.
आजही चंद्राबाबू नायडू यांच्याशी आघाडी केली. नायडू हे काय हिंदुत्ववादी आहेत का? नितीश कुमार हिंदुत्ववादी आहेत का? त्यांच्याकडे डोळेझाक करून आमच्यावर टीका करता, असाही सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.