राज ठाकरे : “शरद पवारांनीच महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये”

Photo of author

By Sandhya

राज ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वपक्षीय नेत्यांचे दौरे सुरु झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सध्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राज्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी,”महाराष्ट्रात आगामी काळात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, अशी भीती शरद पवार यांनी व्यक्त केली होती.

मात्र, शरद पवार यांनीच महाराष्ट्राचा मणिपूर करण्यासाठी हातभार लावू नये,  असा खोचक टोला यावेळी लगावला.  राज ठाकरे हे सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत.

सोलापुरात माध्यमांशी बोलताना त्यांना शरद पवार हे महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण होईल, या वक्तव्यावर विचारण्यात आले त्यावेळी “शरद पवार यांनी महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायला हातभार लावू नये.

महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. मात्र, त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना महाराष्ट्राचा मणिपूर झालेला हवाय की नकोय, याबाबत नेमकं काही समजत नाही, अशी टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.

यापूर्वी भाजपच्या नेत्यांना मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाला शरद पवार यांचे पाठबळ असल्याचे आरोप केले होते. आता राज ठाकरे यांनीही याच भूमिकेची री ओढली आहे.  त्यामुळे आता यावर शरद पवार काय बोलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यात सध्या सुरु असलेलं मराठा आणि ओबीसी राजकारण हे कोणाच्या खांद्यावर बंदुका ठेवून सुरु आहे. या माध्यमातून मतं हातात घेणं सुरु आहे. यापलीकडे ओबीसी किंवा मराठा मुलामुलींच्या भवितव्याचा विचार कोणाकडूनही केला जात नाही. हे केवळ मतांचं राजकारण आहे. हे आपल्याला मूर्ख बनवत आहेत, या सगळ्यातून हाताला काहीही लागणार नाही.

मराठा-ओबीसी हा वाद समाजात विष कालवण्याचा प्रकार आहे. लहान लहान मुलं या आरक्षणाच्या वादामुळे आमची मैत्री तुटली असं सांगत होती, हे सगळं आता शाळा-कॉलेजपर्यंत गेलं आहे. हे चित्र भीषण आहे.

असे वातावरण महाराष्ट्रात कधीच नव्हते. ज्या महाराष्ट्राने आजवर देशाला दिशा दिली तोच महाराष्ट्र आज जातीपातीच्या वादात खितपत पडला आहे, हे चित्र दुर्दैवी आहे. अशाप्रकारचं राजकारण करणाऱ्यांना प्रत्येक समाजाने निवडणुकीवेळी दूर ठेवले पाहिजे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगत राज्य आहे. जितक्या नोकऱ्या उपलब्ध होतात तितक्या दुसरीकडे होत नाही. केंद्र सरकार अनेक ठिकाणी खासगीकरण करत आहे.

खासगी शिक्षणसंस्था आणि कंपन्यांमध्ये आरक्षण आहे का? मग किती नोकऱ्या उपलब्ध होणार. त्यामुळे आपण या सगळ्या बाबी नीट तपासल्या पाहिजेत. हा सगळा माथी भडकावून मतं मिळवण्याचा उद्योग आहे, असा दावा राज ठाकरे यांनी केला.

Leave a Comment