राज ठाकरे : महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही…

Photo of author

By Sandhya

राज ठाकरे

महाराष्ट्राने देशाला दिशा दिली ते आज राज्य जाती-पातीत अडकून पडले आहे. महाराष्ट्राचा विकास पाहता आरक्षणाची गरज नाही. बाहेरच्या राज्यातील मुले आपल्याकडे येतात, शिक्षण घेतात, त्यांना नोकरी मिळते. आपल्या मुलांना नोकरी मिळत नाही. हे बरोबर नाही, राज्यातील म्हणजे भूमिपुत्रांना नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज सोमवारी सोलापुरात केले.

ते म्हणाले, महाराष्ट्राचे मणिपूर होऊ नये, याची काळजी शरद पवार यांनी घेतली पाहिजे. पवारांचे आतापर्यंतचे राजकारण पाहता, त्यांना महाराष्ट्राचे मणिपूर झालेले हवे की नकोय, याबाबत नेमकं समजत नाही.

जातीच्या मुद्दयाला शरद पवार यांनी हातभार लावू नये अशी टीका त्यांनी केली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघनिहाय उमेदवारांची चाचपणी करण्यासाठी राज ठाकरे यांनी सोलापूरचा दौरा सुरू केला आहे. रविवार आणि सोमवार दोन दिवस ठाकरे सोलापुरात तळ ठोकून आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

ठाकरे म्हणाले, आरक्षण आणि राजकारण हे दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे. कुणाच्या खाद्यांवर बंदूक ठेवून मतांचे राजकारण केले जात आहे, हे पाहणे गरजेचे आहे. जातीच्या मुद्यांवर माथी भडकविण्याचा प्रयत्न सध्या राज्यात केले जात आहे.

या पत्रकार परिषदेस मनसे नेते बाळा नांदगावकर, मनसे सहकार सेनेचे प्रदेशाध्यक्ष दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख, सदस्य प्रशांत इंगळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

आदित्य विरोधात उमेदवार देणार वरळीतून मनसे निवडणूक लढवणार असून समोर कोणीही असो आमचे ठरले आहे. कोण, कुठे, कोणत्या मतदारसंघात उभा आहे, याच्याशी मला काही देणंघेणं नाही.

आम्हाला ज्या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे, त्या ठिकाणी उमेदवार उभे करणार आहोत. वरळीत मागील निवडणुकीत 35 ते 40 हजार मते मनसेला मिळाली होती. त्यामुळे आम्ही ती जागा लढवणार आहोत, आमचा उमेदवार निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले.

मोदींकडून गुजरात, उत्तर प्रदेशला प्राधान्य मोदी सरकारकडून क्रीडा क्षेत्रासह अन्यसाठी बजेटमध्ये गुजरात, उत्तर प्रदेशला सर्वाधिक निधी दिला आहे. पंतप्रधान मोदी यांनी सर्व राज्यांना समान न्याय द्यायला हवा. त्यांनी सर्व राज्यांकडे समान पद्धतीने पाहिले पाहिजे. मराठी पतंप्रधान असले तर महाराष्ट्रातच निधी देत असते तरीही मी विरोध केला असता.

पंतप्रधानांनी सर्व राज्यांना समान बघितले पाहिजे. उद्या ते गुजरातमध्ये ऑलिम्पिक आणू पाहत आहेत. सर्वात मोठे स्टेडियमही तिथेच बांधायचे आहे, असे करून चालेल का असा सवाल ठाकरे यांनी केला.

राज्यात 250 जागा लढवणार विधानसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना 225 ते 250 जागा लढणार आहे. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मतदारसंघनिहाय छाननी करण्यात येणार आहे. तसेच आढावा बैठक घेऊन येथील परिस्थिती जाणून घेणार आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.

Leave a Comment