आरक्षण हा साधा सोपा विषय नसून बांगलादेशमधील परिस्थितीवरून सरकारने धडा घ्यावा, असं विधान मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी केलं आहे. तसेच महाराष्ट्र हा सर्व जातीधर्मांच्या लोकांचा असून बांगलादेशसारखी परिस्थिती आपल्या राज्यात कधीही निर्माण होणार नाही, असेही ते म्हणाले. आज माध्यमांशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?- ज्यांना गरिबीच्या झळा बसल्या आहेत, ज्यांचा मुलाला एका टक्क्याने नोकरी मिळत नाही, ज्यांनी आपल्या परिवारासाठी हमाली केली, कष्ट घेतले, त्यांनाच आरक्षणाची खरी किंमत माहिती आहे.
जे मराठांच्या जीवावर मोठे झाले, ज्यांना मराठ्यांमुळे वैभव मिळालं, त्यांना आरक्षणाची किंमत नाही कळणार नाही. अशा लोकांना गोरगरिबांच्या वेदनाही कळणार नाही, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली.
आरक्षणाचा आक्रोश भयानक असतो,- आरक्षणाच्या मुद्द्यावरून बांगलादेशमध्ये जे काही घडलं, तसं महाराष्ट्रात काही होणार नाही. मात्र, आरक्षणाचा आक्रोश किती भयानक असतो, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे.
एवढी समज सरकारला असली पाहिजे आणि त्यातून सरकारने धडा घेतला पाहिजे, असं झालं तर बरं होईल, असेही ते म्हणाले.
महाराष्ट्रात बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवणार नाही- आरक्षण हा साधा सोपा विषय नाही. तिथे लोकांच्या वेदना आणि आक्रोश आहे. मात्र, महाराष्ट्रात बांगलादेशसारखी परिस्थिती उद्भवणार नाही.
कारण महाराष्ट्र हा आमचा आहे. केवळ नेत्यांचा नाही. हा सगळ्या जातीधर्मांच्या लोकांचा हा महाराष्ट्र आहे. इथे शांतता आहे. काही लोक राज्यात दंगली घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मराठा समाज त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ देणार नाही, असेही त्यांनी सांगितले.