मनोज जरांगे हा शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहे. जर त्यांनी विधानसभा लढवण्याचा निर्णय घेतला नाही तर ते शरद पवारांनी उभा केलेला माणूस आहेत यावर शिक्कामोर्तब होईल, असे वक्तव्य वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.
ते सोमवारी अकोल्यात बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या संदिग्ध भूमिकेवरही त्यांनी यावेळी सडकून टीका केली. प्रकाश आंबेडकरांची आरक्षण बचाव यात्रा अकोला जिल्ह्यात दाखल झाली आहे.
ते म्हणाले, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व पक्ष आणि राजकीय नेते येत आहेत. मात्र, ओबीसींचे आरक्षण वाचवायला कुणीच तयार नसल्यामुळे त्यासाठी आपण पुढाकार घेतला.
ही यात्रा मी काढली नसती तर राज्यात दंगली झाल्या असत्या. आता वातावरण निवळले आहे, असा दावाही त्यांनी केला. अशा लोकांवर टाडा लावा शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत आहे,
असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला होता. त्या आरोपाचा समाचार घेताना आंबेडकरांनी जोरदार हल्लाबोल केला. अशा लोकांवर टाडा लागला पाहिजे, असे ते म्हणाले.