विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आलेले शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रीपदाचा संभाव्य चेहरा म्हणून मोर्चेबांधणी सुरू केल्याचे मानले जात आहे.
‘महाराष्ट्राला लुटणाऱ्या महायुतीचा पराभव करणे हाच प्रमुख उद्देश असून मुख्यमंत्रीपदाचा निर्णय कधीही घेता येईल’, असे ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मात्र, ‘मुख्यमंत्री असताना मी चांगले काम केले असेन तर महाविकास आघाडीतील माझ्या सहकाऱ्यांनीच मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीसंदर्भात निर्णय घ्यावा’, असेही ठाकरे म्हणाले. या दौऱ्यामध्ये महाविकास आघाडीतील जागावाटपावरही अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते.
ठाकरेंचा दिल्लीत बुधवारी ‘इंडिया’ आघाडीतील नेत्यांच्या गाठीभेटींचा सिलसिला सुरू होता. काँग्रेसचे पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व राहुल गांधी यांच्याशी ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीतील रणनीती, जागावाटप आदी मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केल्याचे समजते. मंगळवारी संध्याकाळी दिल्लीत दाखल झालेल्या ठाकरे यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांचीही भेट घेतली होती.
महाविकास आघाडीतील घटक पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशीही ठाकरेंनी चर्चा केली. सोनिया गांधींचीही गुरुवारी ठाकरे भेट घेणार आहेत. या गाठीभेटीतून महाविकास आघाडीतील नेतृत्वाचा मुद्दा ठाकरेंकडून ऐरणीवर आणला जात असल्याचे मानले जात आहे.
पवारच भूमिका स्पष्ट करतील!- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शरद पवार यांनी दोन वेळा भेट घेतल्यामुळे तर्कवितर्क केले जात आहेत. धारावीच्या विकासाच्या प्रकल्पाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
पवारांनी धारावीसंदर्भात शिंदेंची भेट घेतली असेल तर पवारांनीच भूमिका स्पष्ट करावी. या भेटीसंदर्भात पवारांनी मला काहीही सांगितलेले नाही, असे ठाकरे म्हणाले.
‘इंडिया’ नेत्यांशी चर्चा- लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच दिल्लीला आले असून त्यांनी बुधवारी ‘इंडिया’तील घटक पक्षांचे नेते काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन, समाजवादी पक्षाचे नेते आदित्य यादव आदींची पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी ठाकरेंची भेट घेतली.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही ठाकरेंना भेटीचे निमंत्रण दिले आहे. राष्ट्रीय स्तरावरील नेत्यांची भेट दिल्लीतच होऊ शकते. प्रत्येक वेळी राजकीय चर्चा केलीच पाहिजे असे नव्हे, वैयक्तिक संवादही होऊ शकतो’, असे ठाकरे म्हणाले.
एकदिलाने लढू!- सांगलीतील काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम व अपक्ष खासदार विशाल पाटील तसेच, ठाकरे गटाचे लोकसभा निवडणुकीतील उमदेवार चंद्रहार पाटील या तिघांनीही एकत्रितपणे बुधवारी ठाकरेंची भेट घेतली. त्यानंतर लोकसभा निवडणुकीतील चुका विधानसभा निवडणुकीत होणार नाहीत याची दक्षता घेतली जाऊ शकते असे ठाकरे म्हणाले.
‘जे महाराष्ट्र लुटत आहेत, त्यांना गद्दारांनी वाहून घेतले आहे. महाविकास आघाडीतील नेते विधानसभा निवडणूक एकदिलाने लढवू’, असे ठाकरे म्हणाले. शिंदे गटातील आमदार विधानसभा निवडणुकीत तिथेच राहून आम्हाला मदत करतील, असा दावा ठाकरे यांनी केला.