मराठा समाजाला ओबीसींमधून ५० टक्क्यांच्या आतील आरक्षण द्यावं, या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील महायुती सरकारला इशारा दिला आहे.
मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नसल्याने सरकारकडून बहाणे बनवण्यात येत आहेत. या सरकारचा जीव हा खुर्चीमध्ये अडकला आहे. मात्र आम्ही त्यांना खुर्चीवरच ठेवणार नाही, असा इशारा, मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारवर टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मी वीस बावीस दिवसांपूर्वी दौरा सुरू होण्यापूर्वीच सांगितलं होतं की, हे सरकार आरक्षण देईल, याची आता आशाच सोडली पाहिजे.
आपल्यालाच लढून आरक्षण मिळवावं लागणार आहे किंवा सत्तेकडे जावं लागणार आहे. एकूण तसं चित्र दिसतंय. गुन्हे मागे घेतो, सरसकट आरक्षण देतोय असं सांगितलं जातंय, आता गुन्हे मागे घेतलेत की नाही माहिती नाही. हैदराबाद संस्थानचं गॅझेट, सातारा संस्थानचं गॅझेट, बॉम्बे गर्व्हर्मेंटचं गॅझेट घेणार म्हणाले होते.
पण तेही घेतलं नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी करायला यांना आठ आठ महिने लागायला लागले आहेत. यावरून हे दिसतंय की यांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचं नाही आहे तर मराठ्यांना झुलवत ठेवायचं आहे, असा दावा जरांगे पाटील यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, आता एकदा आचारसंहिता लागली की, आमची सत्ता आल्यावर आरक्षण देतो, अशी भाषा करायची. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, असं यांचं पक्कं ठरलेलं आहे.
या सरकारचा खुर्चीमध्ये जीव आहे. त्यामुळे मराठ्यांनी आता पक्कं ठरवलं आहे की, यांना खुर्चीमध्ये ठेवायचं नाही. जे होईल ते होईल, पण खुर्ची यांना ठेवायची नाही, असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.