‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या पहिल्या हप्त्याचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आतापर्यंत 80 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्यात आल्याची माहिती शासनाकडून देण्यात आली आहे. 14 ऑगस्टपासून लाभ देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
आतापर्यंत राज्यात 80 लाख महिलांच्या बँक खात्यात 2 महिन्यांच्या लाभाची रक्कम 3 हजार रुपये जमा करण्यात आली आहे. उर्वरित पात्र महिलांनासुद्धा दि. 17 ऑगस्टपर्यत हा लाभ मिळणार आहे.
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी, आत्मनिर्भर करण्यासाठी महिला व बालविकास विभागाच्यावतीने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केल्याचे सांगण्यात येते. या योजनेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 14 ऑगस्टपर्यत 1 कोटी 62 लाखापेक्षा अधिक महिलांची नोंदणी झाली आहे.
अर्ज भरण्यास मुदतवाढ – दरम्यान, या योजनेबाबत एक महत्वाची अपडोट समोर आली आहे. अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून लाडक्या बहिणींना आता सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज भरता येणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात बोलताना याबाबत माहिती दिली आहे. ज्या महिलांचे अर्ज भरणे बाकी होते तसेच त्रुटी होत्या त्यांच्यासाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. यापूर्वी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज भरण्यास सांगण्यात आले होते.
आधार सीडिंगमुळे अनेक महिलांची धावपळ – या योजनेचे पैसे थेट बॅंक खात्यात डीबीटीद्वारे जमा केले जात आहेत. मात्र फाॅर्म भरताना जो खाते क्रमांक दिला आहे त्या खात्यावर नव्हे तर महिलेचे जे खाते आधार सीडिंग आहे म्हणजेच जे बॅंक खाते आधारला लिंक आहे त्या खात्यावर पैसे जमा होत आहेत.
एकापेक्षा जास्त बॅंकेत खाते असलेल्या महिलांची धावपळ होत आहे. अनेकांची जुनी खाती बंद आहेत आणि नेमके तेच खाते आधार लिंक असल्याने नव्याने दुसरे खाते लिंक करण्यासाठी महिलांची बॅंकेत गर्दी वाढली आहे. आधारच्या वेबसाईटवर जाऊन आधार सिडिंग यावर क्लिक करुन तुम्ही तुमचे कोणते खाते लिंक आहे हे तपासू शकता.