“महायुतीतल्या तीन पक्षांमध्ये एकवाक्यता राहिलेली नाही. ती युती नाही, संघर्ष होतो आहे. रोज त्यांच्या मारामाऱ्या सुरु आहेत त्या दिसत नाहीत. एक मंत्री आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्याला मारण्याची भाषा करतो म्हणजे प्रकरण टोकाला गेलं आहे हे पाहू शकता. कारण मुंबई गोवा महामार्ग हा स्वर्गात जाण्याचा मार्ग बनला आहे.
ठेकेदारांकडून महाराष्ट्रात लूट सुरु आहे. पाटबंधारे खातं, रस्ते विकास खातं हे सगळी शिंदे गटाची एटीएम मशीन्स झाली आहेत त्यामुळे कामं होत नाहीत अशी स्थिती आहे. सरकार पैशांच्या मागे लागलं आहे.
खड्ड्यांमध्ये अपघात होऊन लोकांचे मृत्यू होत आहेत मात्र सरकारचं लक्ष नाही. जागावाटपावरुनही यांच्यात मारामाऱ्या होणार आहेत, खून खराबा होऊ एवढीच आमची इच्छा आहे.” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
नवाब मलिकांवरची कारवाई सूडबुद्धीने
“विधानसभेची मुदत संपत आली आहे. पण नवाब मलिक यांच्यावर सुडाने कारवाई करण्यात आली. देवेंद्र फडणवीस आणि काही लोकांवर नवाब मलिक सातत्याने बोलत होते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी ईडी कारवाई, सीबीआयची कारवाई करायला भाग पाडलं. आज नवाब मलिक सरकारमध्ये आहेत.
माझा प्रश्न इतकाच आहे फडणवीसांना की नवाब मलिक जामिनावर सुटून आले आणि विधानसभेत सरकारी बाकांवर बसले होते तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना नीतमत्तेचा पुळका येऊन फार मोठं पत्र लिहिलं होतं. हे कसं योग्य नाही, मलिकांवर कशा केसेस आहेत?, भाजपाच्या भावना काय आहेत हे म्हटलं होतं.
आता देवेंद्र फडणवीसांनी ते पत्र मागे घेतलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावं की नवाब मलिकांवरचे सगळे आरोप खोटे आणि सुडबुद्धीने केले आहेत. ” अशी मागणी आता संजय राऊत यांनी केली आहे.
देवेंद्र फडणवीस हे खोटारडे नंबर एक
“देवेंद्र फडणवीस हे खोटारडे नंबर एक आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी काय पत्र लिहिलं होतं ते वाचलं पाहिजे. त्यांना ते पत्र सापडत नसेल तर मी त्यांना देतो माझ्याकडे त्याची कॉपी आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना नवाब मलिकांबाबत लिहिलेलं पत्र हे राष्ट्रभक्तीचा नमुना सांगणारं ऐतिहासिक डॉक्युमेंट आहेत.
आता ठाम भूमिकेचं कसलं सांगत आहात? तुम्ही मान्य करा की मलिकांवरचे खटले खोटे आहेत. खोटारडेपणा करु नये” असं संजय राऊत म्हणाले. नवाब मलिक महायुतीत आले आहेत त्यामुळे ते आता लाडके मलिक झाले आहेत तसंच त्यांनी एकनाथ शिंदेंच्या दाढीला आग लावली आहे असंही संजय राऊत म्हणाले. आता याबाबत देवेंद्र फडणवीस काही उत्तर देणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.