काटकसरीने घर चालवणाऱ्या बहिणींना आधार देण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आणि दोन महिन्याचे तीन हजार रुपये देखील खात्यावर जमा करण्यात आले.
मात्र, बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणीपेक्षा महिलांना सुरक्षित कधी करणार, असा प्रश्न विरोधक करत आहेत. लाडकी बहीण योजनेबरोबरच आता सुरक्षित बहीण योजनाही राबवण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत आयोजित महिलांचे महाशिबिर शुक्रवारी पंचवटीत तपोवन मैदानावर पार पडले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री दादा भुसे, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, आम्ही शब्द पाळणारे भाऊ आहोत. निवडणुकीनंतरही ही योजना सुरूच राहिले याची मी हमी देतो.
अजित पवार यांच्या अनुपस्थितीची चर्चाउपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमाला उपस्थित नसल्याने तो चर्चेचा विषय ठरला. याशिवाय आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर यांच्या अनुपस्थितीने या चर्चेत आणखी राजकीय रंग भरल्याचे दिसले.
मुळातच विलंबाने नाशिकमध्ये आलेले अजित पवार कार्यक्रम स्थळी येताना वाहनांच्या गर्दीत अडकले आणि त्यामुळेच त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली, अशी माहिती सूत्रांनी दिली.