सिंधुदुर्गातील मालवण येथे असलेल्या राजकोट किल्ल्यावर नौदल दिनानिमित्त ४ डिसेंबर २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या २८ फुटी पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले होते.
हा पुतळा सोमवारी (दि. २६ ऑगस्ट) रोजी कोसळल्यानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. आता शालेय शिक्षण मंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी त्याचठिकाणी १०० फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे.
एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना दीपक केसरकर म्हणाले, “मी अद्याप मालवणला भेट दिलेली नाही. मालवण येथील पुतळा नौदलाने स्थापन केला होता. सदर पुतळा कोसळणे हे दुर्दैवी आहेच, पण यातून काही चांगल्या बाबी घडू शकतात.
या पुतळ्याची उंची २८ फूट होती. मात्र येथील लोकांनी १०० फुटांचा पुतळा असावा, अशी इच्छा व्यक्त केली होती. जर १०० फुटांचा पुतळा याठिकाणी उभा केल्यास ती सर्वांसाठीच अभिमानाची बाब असेल. मी राजकोट किल्ल्याचा दौरा करून पाहणी करणार आहे.”
“मालवणचा दौरा केल्यानंतर मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार आहे. आमच्याकडे मोठ्या पुतळ्याचे एस्टिमेट तयार आहे. मुंबईत आम्ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारत आहोत.
त्यामुळे तेवढा मोठा नाही, मात्र राजकोट किल्ल्यावर बसू शकेल एवढा मोठा पुतळा नक्कीच याठिकाणी उभारू. मी सिंधुदुर्गचा रहिवासी आहे. नौदलाने पुतळा उभारल्यामुळे आम्ही काही म्हणालो नव्हतो. पण व्यक्तिशः मला हा पुतळा लहान वाटला होता. त्यामुळे आता मोठा पुतळा उभारला गेला पाहिजे”, अशी मागणी दीपक केसरकर यांनी केली.
विरोधकांकडून राजकारण : हा पुतळा नौदलाने उभारला होता. नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व राजकीय पक्षाहून मोठे आहेत. त्यांच्याबद्दल राजकारण व्हायला नको. नौसेना स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील पहिलेच राजे होते.
विजयदुर्ग येथे लढाऊ नौका तयार केल्या जात होत्या. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा आपल्या सर्वांना अभिमान असला पाहिजे, असेही दीपक केसरकर म्हणाले.