आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील अधिक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर सातत्याने आसूड ओढताना दिसत आहेत. महायुती सरकारच्या धोरणांवर, योजनांवरही सातत्याने टीका करत आहेत.
अशातच यावेळी सर्वांना पाणी पाजणार, करेक्ट कार्यक्रम करणार, असा एल्गार मनोज जरांगे यांनी केला. तसेच लाडकी बहिणीला पैसे दिले, पण आमच्या आरक्षणाचे काय? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
मी यांचा कार्यक्रम लावतो. आता आखाडा जवळ आला आहे. सावध राहण्याची गरज आहे. या वेळेस सगळ्यांना पाणी पाजायचे आहे. यांना यांची जागा येणाऱ्या काळात दाखून द्यायची आहे.
२९ तारखेची बैठक रद्द केली. उमेदवार उभा करायचे म्हटले की भाजपा खुश होते. पण मी त्यांच्यापेक्षा पुढचा आहे. या निवडणुकीत यांना पाणीच पाजायचेच आहे. यांना खुर्ची मिळू द्यायची नाही. हे सरकार मराठा समाजाचा मुळावर उठले आहे, या शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला.
मराठा समाजाचा धसका घेत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली आमची लेकरे जेलमध्ये घातली. त्यांना सरळ करणार आहे. रेकॉर्ड शोधणे बंद आहे. हे संपूर्ण देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरून होत आहे.ज्या लोकांनी आम्हाला त्रास दिला त्यांचा हिशोब चुकता करणार आहे. लेकरांवर झालेला अन्याय विसरू नका. त्यादिवशी यांचा करेक्ट कार्यक्रम करा.
मराठा समाजाचा धसका घेत देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली होती. मी डाव टाकला आणि २९ तारखेला होणारी बैठक पुढे ठेवली. तिथेच देवेंद्र फडणवीस यांचा डाव हुकला, असा दावा मनोज जरांगे यांनी केला. दरम्यान, राज्यात देवेंद्र फडणवीस यांनी वातावरण गढूळ केले. मी मॅनेज होणारा नाहीं म्हणून माझ्याविरोधात डाव रचला जातो.
हा देवेंद्र फडणवीसांचा गनिमी कावा आहे. हैदराबादला साडेतीन हजार कुणबी नोदीचे पुरावे सापडले असतानाही देवेंद्र फडणवीस इकडे आणू देत नाहीत. देवेंद्र फडणवीस यांनी मराठ्यांवर अन्याय केला आहे, असे टीकास्त्र मनोज जरांगे पाटील यांनी सोडले.