चारशे वर्षांपूर्वी बांधलेल्या शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा एक दगडही पडत नाही. मात्र आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतो ही महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीनेही दुर्दैवी घटना आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आवस्था बघून खूप वेदना झाल्या आणि संतापही येतो. उद्घाटनाच्या घाईसाठी अनुभव नसणाऱ्यांना पुतळा उभारणीचे काम दिले गेले. फक्त इव्हेंट करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांबाबतही हे सरकार असं करतंय, असा आरोप काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केला आहे.
नौदलावर ढकलून सरकारला आपल्या जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही. नौदलाचा इतिहास वेगळा आहे. नौदलाच अपमान करु नका, चूक झाली आहे तर सरकारने माफी मागितली पाहिजे,
कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांचीच इच्छा असेल की पुन्हा उभारला जाणार पुतळा हा महाविकास आघाडीकडून उभारला जावा. ती जबाबदारी आता आमचीच असणार आहे. पुतळा उभारतानाची एक नियमावली आहे.
राज्याचे कला संचालनालय हे पुतळ्यांची पाहणी आणि कामकाज पाहणारा विभाग आहे. पुतळा उभारण्याची परवानगी देताना अनेक बाबी तपासल्या जातात. मात्र तसं झालेलं दिसत नाही.
हे महायुती नाही तर महागळती सरकार आहे. यांनी बांधलेलं संसद भवन, राम मंदिर, विमानतळ गळत आहे. आता तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाही पडलाय.
ही महाराष्ट्रासाठी संतापजनक आणि राज्याला मागे नेणारी घटना आहे. राजकोट किल्ल्यावरील घटनेची जबाबारी घेऊन सरकारने माफी मागत राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी केली आहे.