मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेच्या निषेधार्थ रविवारी (दि. १) महाविकास आघाडीच्या वतीने हुतात्मा स्मारक ते गेट वे इंडियापर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे.
यावेळी शिवरायांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केले जाईल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. २८) पत्रकार परिषदेत दिली. राजकोट किल्ल्यावर ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांचा रस्ता अडवणारे शिवद्रोही आहेत, असा घणाघातही ठाकरे यांनी यावेळी केला.
ठाकरे पुढे म्हणाले की, या मोर्चात महाविकास आघाडीचे सर्व नेते सहभागी होणार आहेत.तिन्ही पक्षातील शिवप्रेमी मोर्चात सहभागी होणार आहेत. यावेळी जोडे मारून सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. महायुतीचे सरकारचे पाप उघड झाले आहे. कायदा सक्षम आहे, पण पोलीस यंत्रणेवर दबाव आहे.
महायुतीच्य़ा भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर जे बोलले आहेत. ते संतापजनक आहे. राजकोट किल्ल्यावर शिवसैनिकांचा रस्ता अडवणारे शिवद्रोही आहेत, तसेच मोदी- शहांचे दलाल आहेत, अशी टीकाही ठाकरे यांनी केली. निवडणुका डोळ्यासमोर पुतळा उभारण्यात आला.
ठराविक वेळेत पुतळ्याचे काम करण्यास ठेकेदाराला सांगण्यात आले आहे. छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळण्याची घटना याआधी कधी घडलेली नाही. पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन झालेला पुतळा कोसळत असेल, तर गुन्हेगार कोण ? नौदलावर जबाबदारी टाकून मोकळे होणार का? असा सवाल ठाकरे यांनी केला.
राज्यातील महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराने सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येऊन या मुद्द्यांवर चर्चा केली. दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची कशी दुरवस्था झाली हे लोकांनी पाहिले.
राज्यभवन समुद्रकिनारी आहे, पण राज्यपालांची टोपीही कधी उडली नाही. आणि वाऱ्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, हे कसं शक्य आहे? असा सवाल ठाकरे यांनी केला.
शरद पवार म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी उद्घघाटन केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात घाई केलेली आहे. या घटनेमुळे सरकारच्या विरोधात जनतेच्या मनात प्रचंड चीड आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांचे महाराज हात कलम करायचे, असे त्यांनी सांगितले.
नाना पटोले म्हणाले की, शिवरायांच्या स्मारकाच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे, असे सांगून पुतळा कोसळल्याच्या घटनेवर काँग्रेसने तयार केलेली रील ऐकवली. ते पुढे म्हणाले की , सरकारच्या निषेधार्थ प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात जोडे मारो आंदोलन केले जाईल. महायुती सरकार कमिशनखोर आहे. मुली शाळेतही सुरक्षित नाहीत,असेही ते म्हणाले.