देशात ज्याप्रमाणे मुंबई ही आर्थिक इंजिन आहे त्या प्रमाणे पुढील काही वर्षात रायगड जिल्हा महाराष्ट्रासाठी आर्थिक इंजिन म्हणून उदयास येणार असून जिल्हा हा उद्योगांचे मॅग्नेट होणार असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी उरण येथे बोलताना केले.
फडणवीस यांच्या हस्ते उरणच्या मागील पंधरा वर्षांपासून रखडलेल्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन, दास्तान दिघोडे-रानसई रस्त्याचे भूमिपूजन व नगर परिषदेच्या प्रशासकीय भवन, सावित्रीबाई फुले फुलबाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर तसेच सिडकोने चारफाटा येथे बांधलेल्या मासळी बाजाराचे उद्घाटनाच्या कार्यक्रमाप्रसंगी ते उरण येथे आले होते.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीत एक सुद्धा आयकॉनिक प्रकल्पाचे उद्घाटन केले असल्यास सांगावे असे सांगून मी माझ्या कार्यकाळात हमारी प्रकल्पाचे उद्घाटने केली असल्याचे सांगितले. उद्धव ठाकरे यांनी बारसू रिफायनरी थांबविण्याचे काम केल्याचा आरोपही त्यांनी केला.
वाढवणमुळे विकासाला भर नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन झालेले बाढवण बंदर हे जगातील १० बंदरात येणार असून भारतातील बंदरांतील सर्व बंदरांएवढी क्षमता या बंदरात असणार आहे. जेएनपीएच्या ३ पट हे बंदर मोठे असणार आहे.
नवी मुंबई विमानतळामुळे देशाच्या जीडीपीत १ टक्के वाढ होणार असल्याचे देखिल त्यांनी सांगितले. आमदार महेश बालदी यांच्या कामाचे कौतूक करताना बालदी यांच्या प्रयत्नामुळे बारापुरी बेटावर वीज पोहचली असून त्याची दखल पंतप्रधानांनी घेतली असल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून केला.
यावेळी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार श्रीरंग बारणे यांची ही भाषणे झाली. उदय सामंत यांनी महेश बालदी यांच्या मच्छिमारांसाठी केलेल्या विकास कामांचे कौतूक केल.
कार्यक्रमाला माजी खासदार रामशेठ ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार रविंद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, सिडकोचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.