महायुती सरकारकडून राज्यात मोठ्या प्रमाणात झालेली विकासकामे आणि लोकप्रिय योजनांना मिळत असलेला उत्स्फुर्त प्रतिसाद यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. लोकसभेत खोटे नॅरेटीव्ह पसरवणार्यांना विधानसभा निवडणुकीत थारा मिळणार नाही.
महायुतीच्या कामाच्या धडाक्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक विधानसभेच्या जागा महायुतीच्या येतील, असा विश्वास खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी येथे व्यक्त केला. सत्ता असताना अडीच वर्षात केवळ अडीच दिवस मंत्रालयात जाण्याचा काहींनी विक्रम केला असून त्यांनी अनेक लोकोपयोगी योजना बंद करण्याचे पाप केल्याची टिका खा.डॉ. शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांचे नाव न घेता केली.
इचलकरंजीत जनसंवाद दौर्यानिमित्त आलेल्या खा. डॉ. शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, कागल, करवीर, कोल्हापूर शहर, इचलकरंजी, हातकणंगले, शाहूवाडी, शिरोळ, राधानगरी अशा विविध विधानसभेच्या मतदारसंघनिहाय बैठका पार पडल्या. प्रत्येक विधानसभानिहाय आढावा, पक्ष बांधणी, विधानसभेची तयारी याची सविस्तर माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देणार आहे.
महायुती सरकारने गेल्या दोन वर्षात केलेली लोककल्याणकारी योजना आणि कामे यांना उदंड प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेसह विविध योजनांना सकारात्मक प्रतिसाद लाभल्याने महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण असून ते महायुतीचाही आत्मविश्वास वाढवणारे आहे.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची मागणी अधिक आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांना इचलकरंजी मतदारसंघातून उमेदवारी देण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती. त्यावर खा.डॉ.शिंदे यांनी जो चांगले काम करतो, संघटना वाढवतो त्याला संधी देण्याचे काम मुख्यमंत्री आणि पक्षात होत असते असे सांगितले.
त्याचबरोबर आ.प्रकाश आवाडे महायुतीचे सहयोगी असून ते आमच्यासोबतच आहेत. कोणाला कोठून उमेदवारी द्यायची याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यासह महायुतीच्या वरिष्ठ पातळीवर होईल, असेही त्यांनी नमूद केले.
हातकणंगलेतून कोणतेही माजी आमदार शिवसेनेच्या संपर्कात नसल्याचे तसेच शिरोळ मध्येही राजेंद्र पाटील-यड्रावकर आमच्यासोबतच असल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. यावेळी खा.धैर्यशील माने, शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, मुरलीधर जाधव,शहराध्यक्ष भाऊसो आवळे, सतीश मलमे आदी उपस्थित होते