बाळासाहेबांचे विचार सोडल्याने आज उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरावं लागतंय असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. त्याशिवाय मालवण प्रकरणी राजकारण करणं दुर्दैवी आहे. सातत्याने आरोप करणाऱ्या संजय राऊतांनी ठाण्यातील एका रुग्णालयात दाखल व्हावं असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
मुंबईत पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, मालवण प्रकरणी कुणालाही सरकार सोडणार नाही. दोषींना कठोर शिक्षा होईल.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत, प्रत्येकाच्या मनात त्यांच्याबाबत श्रद्धा, झालेली घटना दुर्दैवी आहे आणि त्यावर राजकारण करणे त्याहून दु्र्दैवी आहे. जयदीप आपटे असो वा अन्य कुणीही कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही. तो कुठेही असेल त्याला पकडू असं मी म्हटलं होते आणि आता त्याला पकडलंय असं त्यांनी सांगितले.
त्याशिवाय विरोधक जे राजकारण करत होते त्यांना जयदीप आपटे अटकेनंतर चपराक मिळाली आहे. जयदीप आपटेची चौकशी होऊन कारवाई होईल. ही घटना दुर्दैवी होती मात्र त्यावर विरोधकांनी राजकारण केले.
सरकार छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्यदिव्य पुतळा लवकरात लवकर पुन्हा तिथे उभारेल हे आमचं उद्दिष्ट आहे असं त्यांनी सांगितले. यावेळी संजय राऊतांवर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांना ठाण्यातील एका रुग्णालयात उपचाराची गरज आहे असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लगावला.
दरम्यान, जेव्हा बाळासाहेब ठाकरे होते, तेव्हा दिल्लीहून नेते इथं यायचे आता उद्धव ठाकरेंना दिल्लीच्या गल्लीगल्लीत जावं लागतंय, मला मुख्यमंत्री करा असं सांगावे लागतेय हे पाहून बाळासाहेबांनाही दु:ख होत असेल.
बाळासाहेबांचा विचार सोडल्यानंतर अशी परिस्थिती झाली आहे. आम्ही बाळासाहेबांचा विचार, आनंद दिघेंचा विचार घेऊन पुढे जातोय. राज्याचा विकास करतोय. राज्यात कल्याणकारी योजनाही आणत आहोत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.