राहुल गांधी : “चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, भ्रष्टाचारामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला”

Photo of author

By Sandhya

राहुल गांधी

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळेच कोसळला. चुकीचे केल्यानंतरच माफी मागितली जाते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली; मात्र त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचीही माफी मागितली पाहिजे, असे मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

कडेगाव येथे दिवंगत काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते. 

राहुल गांधी म्हणाले, पतंगराव कदम यांनी ६० वर्षे पारदर्शक व प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी आयुष्यात कधी माफी मागितली नाही; कारण चुकीचे काम केले तरच माफी मागावी लागते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर कोणत्या कारणाने पंतप्रधान यांनी माफी मागितली? पहिले कारण म्हणजे आरएसएसच्या व्यक्तीला कंत्राट दिले. त्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले गेले. चुकीच्या व्यक्तीला काम दिल्याने आणि भ्रष्टाचार झाल्याने पुतळा कोसळला. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. त्यामुळे मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागायला हवी.

देशात सध्या विचारधारेचे युद्ध सुरू आहे. धर्माधर्मांत, जातीजातींत आणि भाषेवरून वाद निर्माण करून त्यांना द्वेष पसरवायचा आहे. या विचारधारेविरुद्ध आमची लढाई आहे, असे गांधी म्हणाले.

पतंगराव कदम यांचे योगदान मोलाचे : शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या  शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी, शिक्षणतज्ज्ञांनी मोठे योगदान दिले. यात आधुनिक काळात पतंगराव कदम यांचे योगदानही मोलाचे आहे. 

महाराष्ट्र गहाण ठेवू नका : खरगे मतांसाठी ‘लाडकी बहीण’चे आमिष दाखविले आहे. जनतेने दीड ते दोन हजार रुपयांसाठी नरेंद्र मोदींकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवू नये. त्यांच्या पैशाला ठोकर मारून संविधान संपवू पाहणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केले.

सोनिया गांधींशी भावनिक नाते : कदमदेशाच्या स्वराज्याची लढाई सांगलीतून सुरू झाली, याचा अभिमान आहे. सोनिया गांधी यांच्याशी कदम कुटुंबाचे भावनिक नाते आहे, अशी भावना डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रास्ताविकात बोलून दाखविली.

Leave a Comment

You cannot copy content of this page