राज्यातील विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे 113 आमदार पाडू, असे आव्हान मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे आंदोलक मनोज जरांगे यांनी काही दिवसापूर्वी दिले होते. त्यांच्या या आव्हानाला आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगेंना प्रतिआव्हान दिलंय.
मनोज जरांगे पाटलांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी २८८ मतदारसंघात उमेदवार उभे करून दाखवावेत त्यातही त्यांनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी, असे त्यात आव्हान छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांना दिले आहे. मनोज जरांगेविषयी बोलताना छगन भुजबळ यांनी, आता मनोज जरांगे मुस्लिमांनाही आरक्षण द्या, असे म्हणत आहेत. मात्र मुस्लीम समाजाला राज्यात 25 वर्षापूर्वी आरक्षण देण्यात आले आहे.
इकडे माळी समाज, तिकडे बागवान, इकडे खाटीक तिकडे कुरेशी, इकडे कासार तिकडे मण्यार, असे मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. मात्र अर्धवट माहिती असणारे लोक असे बोलतात. ते मध्येच बोलतात की, मी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार, मी हे करणार वैगेरे. तू एकच काम कर, 288 जागा लढव, असे आव्हान त्यांनी मनोज जरांगे पाटलांना दिले.
मला पाडण्यापेक्षा माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी तर, मनोज जरांगे यांनी छगन भुजबळ यांना निवडणुकीत पाडू, असे वक्तव्य केले होते. याबाबत विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, मनोज जरागेंनी मला पाडण्यापेक्षा माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही.
मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवय आहे. रस्त्यावर लढण्याची आणि सरकारमध्ये राहून काम करण्याची माझी तयारी आहे. येवला मतदारसंघात कुणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार आहे. त्यांनी काहीतरी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावं, असा निशाणा त्यांनी यावेळी साधला.
मनोज जरांगेंना मी गांभीर्याने घेत नाही ते पुढे म्हणाले की, यावर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया विचारली तर आम्हाला राजकारण नको, राजकारणात जायचे नाही, असे ते बोलणार, त्यानंतर पुन्हा पाडायच्या भाषा वापरणार, 288 उमेदवार उभे करण्याची भाषा करतील. एकेकाला बोलावून पुन्हा माहिती घेतील. काहीतरी सर्व्हेक्षण करतील.
त्यामुळे मनोज जरांगेंना मी गांभीर्याने घेत नाही, असेही छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. हेही वाचा “गणरायाचे आगमन सर्वांना आनंदाचे, समृद्धी, समाधानाचे पर्व घेऊन येवो” ; मुख्यमंत्र्यांकडून जनतेला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा