जास्त काळ शरद पवारांसोबत राहिल्याने त्यांच्या मनातील मला कळते, असा दावा करतानाच राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांनी अमित शाह यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नसल्याचे वक्तव्य केले आहे. जयंत पाटील यांनी सांगलीच्या लोकसभेच्या राजकारणावरही भाष्य केले.
श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने महाराष्ट्र व्हिजन-२०५० या विषयावर पाटील बोलत होते. शरद पवारांची भूमिका कायम त्यागाची राहिली आहे. आमच्या पक्षाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. तुतारी हातात घेण्यासाठी लोकांच्या भावना आहेत. मुख्यमंत्री कोण होईल या पेक्षा आता असलेले सरकार घालविणे जास्त महत्वाचे आहे. भारतीय जनता पार्टी सुतकात आहे.
मूळ भाजपवाले बाजुला राहिले आणि बाकीचे लोक पक्ष चालवत आहेत, अशी टीका पाटलांनी केली. आरक्षणावर सरकारने जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा, आमचा पाठिंबा असेल. भाजपची लोकप्रियता कमी झालेली आहे. त्यामुळे ते अजित पवारांना वेगळे लढावे, मग एकत्र येऊ असे सांगतील, अशी शक्यताही त्यांनी वर्तविली.
सांगलीतील लोकसभेच्या राजकारणावर बोलताना जयंत पाटील यांनी चंद्रहार पाटलांना उद्धव ठाकरेंनी परस्पर तिकीट देणे हे मीच मुद्दामहून घडवून आणले असे वाटत असल्याचे सांगितले. पश्चिम महाराष्ट्रात एकतरी जागा लढवायची अशी ठाकरेंची इच्छा होती.
काँग्रेसचे हातकणंगले शेट्टीना द्यायचे चालले होते. त्यामुळे ठाकरेंना जागा नव्हती, यातून त्यांनी अचानक जागा जाहीर केली, असे पाटील म्हणाले. उलट मलाच चंद्रहार पाटील म्हणाले होते, की त्यांना हे तिकीट कसे काय मिळाले, असा गौप्यस्फोटही पाटील यांनी केला. पक्ष कसा चालला पाहिजे याचा माझ्या एवढा अनुभव कोणाला नाही.
माझे दिवस मोजणाऱ्यांना पण माहित आहे, मी किती दिवस आहे. अमित शहा यांना देवेंद्र फडणवीस यांच्या मनात काय चाललेय हे कळत नाहीय. उरलेले दोघे सत्तेसाठी त्यांच्यासोबत गेले आहेत. आम्ही राजकारणी लोक मत कशी पडतील हे पाहतो. पण जनतेने थोडीशी जबाबदारी घ्यावी, तात्पुरता विचार कोण करतेय. आणि महाराष्ट्राच्या हिताचा कोण विचार करतेय हे जनतेलाच समजून घ्यावे लागेल, असेही पाटील यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. निवडणूक आयोगात आता कणा राहिला नाही. राजकारणात विश्वासघाताचे प्रमाण वाढले आहे. या गोष्टीतून महाराष्ट्राला बाहेर काढले पाहिजे. समाज्याने तात्पुरत्या मिशनवर असणाऱ्या लोकांना घरी घालवावे, असे आवाहनही पाटील यांनी केले.