संजय राऊत : “२ महिन्यांत आमचे सरकार, लाडकी बहीण योजनेत ३ हजार रुपये देणार”

Photo of author

By Sandhya

संजय राऊत

१५०० रुपयांत लाडक्या बहि‍णींचे काम होते का, लाडक्या बहिणींचे अनेक प्रश्न आहेत. महागाईचे प्रश्न आहेत, मुले बेरोजगार आहेत, ते प्रश्न कोणी सोडवायचे, १५०० रुपये दिले म्हणून मत मिळतील, या भ्रमात हे सरकार आहे.

परंतु, लाडक्या बहि‍णींनी ते पैसे घ्यावेत, कारण ते पैसे आपलेच आहेत. आपल्याच टॅक्सच्या पैशातून ते पैसे दिले जात आहेत. आता, दोन महिन्यानी आमचे सरकार येत आहे, तेव्हा या योजनेत आम्ही ३ हजार रुपये देणार आहोत, असा शब्द ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केल्यापासून या योजनेबाबत एका बाजूला विरोधक टीका करत असून, दुसऱ्या बाजूला मात्र या योजनेचे पैसे वाढवून देऊ, असे आश्वासन विरोधक देत आहेत. यातच लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून देण्याबाबत महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये स्पर्धा रंगल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम २ हजार रुपये करू, असे आश्वासन दिले होते. आता त्यापुढे जात संजय राऊत यांनी आमचे सरकार आल्यास ३ हजार रुपये देऊ, असा शब्द दिला. 

संजय राऊतांचा मराठवाडा दौरा आणि पंतप्रधान मोदींवर टीका संजय राऊत मराठवाडा दौऱ्यावर असून, नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे शिवसेना पदाधिकारी मेळाव्यात बोलताना केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा मान ठेवू शकत नाही. प्रतिष्ठा जपू शकत नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी माफी मागतात, महाराजांच्या नावाने मते मागता, राज्य करता, पंतप्रधान ज्या गोष्टीला हात लावतील, तिचा सत्यानाश होतो, अशी बोचरी टीका संजय राऊतांनी केली.  दरम्यान, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मुदत आता ३० सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली असून, या योजनेत आता ३० तारखेपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

याचा फायदा लाखो महिलांना मिळणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला असून दीड कोटींपेक्षा जास्त महिलांच्या बँक खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसेही जमा झाले आहेत.  

Leave a Comment