रामदास आठवले : “बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”

Photo of author

By Sandhya

रामदास आठवले

राहुल गांधी आरक्षण संपवण्याची भाषा करत असतील, तर काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल. भाजपा सत्ते आल्यास आरक्षण संपवतील, संविधान बदलतील, लोकशाही धोक्यात आहे, अशी विधाने काँग्रेस आणि इंडिया आघाडीचे लोक करत होते.

परंतु, आता राहुल गांधी आरक्षण संपवण्याचे विधान करत आहेत. परदेशात जाऊन भारताबाबत अशी विधाने करणे योग्य नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करावा, अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. 

प्रत्येक राज्यातील आरक्षणापासून वंचित असलेल्या जाती आता आरक्षणाची मागणी करत आहेत. आंदोलन करत आहेत. त्यांचा आरक्षणासाठी संघर्ष सुरु आहे. त्याचवेळी सामाजिक आधारावर नको तर आर्थिक परिस्थितीवर आरक्षण द्या, अशी मागणी होऊ लागलेली आहे.

मात्र, सध्या आरक्षण संपवण्याची ही वेळ नव्हे. ज्यावेळी योग्य वेळ येईल, त्यावेळी काँग्रेस आरक्षण संपविण्याचा विचार करेल, असे राहुल गांधी यांनी अमेरिकेत म्हटले होते.

यावरून भाजपाने राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकारांशी संवाद साधत असताना रामदास आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत थेट पासपोर्ट रद्द करण्याची मागणी केली. 

राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्दच करून टाकावा जोपर्यंत आम्ही सत्तेत आहोत, तोपर्यंत आरक्षणाला धक्का लागू शकत नाही. राहुल गांधी यांनी बालिशपणा सोडावा. राहुल गांधींनी परदेशात जाऊन भारताची निंदा करणे योग्य नाही. लोकशाही धोक्यात नाही. राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला धोका असू शकतो, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी लगावला.

तसेच भारतातील लोकशाही कधीही धोक्यात येऊ शकत नाही. राहुल गांधींनी विधाने केली म्हणून आरक्षण संपुष्टात येऊ शकत नाही आणि त्यांचे सरकारही येणार नाही. अशा प्रकारची वक्तव्ये करून राहुल गांधी यांनी स्वतःचीच प्रतिमा मलीन करून घेतली आहे. राहुल गांधींनी योग्य पद्धतीने आपल्या भूमिका मांडाव्यात. परदेशात जाऊन देशाची निंदा करणे योग्य नाही.

राहुल गांधी परदेशात जाऊन सातत्याने अशी विधाने करणार असतील, तर माझी सूचना अशी असेल की, राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्दच करून टाकावा, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.  दरम्यान, राहुल गांधी अशा प्रकारची विधाने बाहेर जाऊन करतात, हे शोभत नाही. राहुल गांधी यांचे विधान समर्थनीय नक्कीच नाही.

त्याचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष राजकारणातून संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. त्यामुळे राहुल गांधी यांनी बाहेरच्या देशात जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करु नये, असे रामदास आठवले यांनी म्हटले आहे. 

Leave a Comment