विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची एक आढावा बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार,
विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील आदींसह काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असा दावा केला.
लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदलले आहे. भाजपा सरकारच्या काळात लोकांचे जगणे कठीण झाले आहे. जनता त्रस्त आहे. जनतेला आता बदल हवा आहे.
राज्यात सध्या काँग्रेसमय वातावरण आहे. त्यामुळे आपण सर्वांनी काँग्रेस पक्षाचा विचार घेऊन तळागाळापर्यंत जाऊन काँग्रेसचा विचार लोकापर्यंत पोहोचवा व राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणा, असे विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील म्हणाले.
भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार महायुती सरकारला सत्तेचा अहंकार झाला आहे. सर्वसामान्य जनतेला चिरडून टाकणारे सत्ताधारी पक्षातील नेत्यांचेच नातेवाईक आहेत. महायुतीचे सरकार भ्रष्ट मार्गाने आलेले आहे, आजही वाड्या वस्त्यावर ५० खोके एकदम ओके, हे विसरले नाहीत.
भ्रष्ट महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार केला. पंतप्रधानांनी ज्यांच्यावर ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, त्यालाच चार दिवसांनी सरकारमध्ये घेतले व तिजोरीच्या चाव्या दिल्या. ना खाऊंगा, ना खाने दुंगा म्हणाऱ्यांनीच भ्रष्टाचाऱ्यांना सत्तेत घेतले. भ्रष्टाचारावर बोलण्याचा भाजपाला अधिकार नाही.
विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील, त्या निवडणुकाही महत्वाच्या आहेत त्यासाठी आतापासूनच काम करा. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय होऊन मविआचाच मुख्यमंत्री होईल, असे बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
दरम्यान, राहुल गांधी यांनी सातत्याने हिंसेचा विरोध करून ‘नफरत की बाजार में मोहब्बत की दुकान’ सुरु केली. केंद्र सरकारने देशात दहशतीचे वातावरण निर्माण केले असताना राहुल गांधी यांनी ४००० किमीची पदयात्रा काढून देशातील वातावरण बदलवून टाकले.
देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी त्यांनी ही यात्रा काढली. राहुल गांधी हे संयमी नेते आहेत पण भाजपा त्यांच्यावर जीवावर उठले आहे, त्यांना सातत्याने धमक्या दिल्या जात आहेत. काँग्रेस पक्ष हे सहन करणार नाही, ईंट का जवाब पत्थर से देंगे, असा इशारा नाना पटोले यांनी दिला.