गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील अनेक उद्योगधंदे व कारखाने गुजरातला गेल्याचं पाहायला मिळालं आहे. यावरून विरोधी पक्ष सातत्याने राज्य सरकारवर टीका करत आहे.
मात्र, राज्यातील उद्योगधंदे राज्याबाहेर गेले नाहीत असा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच त्यांनी म्हटलं आहे की उद्योग महाराष्ट्राबाहेर जाणं हे विरोधकांनी तयार केलेलं नरेटिव्ह (अपप्रचार) आहे. ते आता तोंडावर पडले आहेत.
एका बाजूला फडणवीसांनी दावा केला आहे की कोणताही उद्योग राज्याबाहेर गेलेला नाही. उलट फडणवीसांनी विरोधी पक्षांवरच तोंडसुख घेतलंय. आशातच पुन्हा एकदा राज्यातील एक उद्योग राज्याबाहेर गेल्याची बातमी समोर आली आहे.
“महाराष्ट्रात येणारा आणखी एक प्रकल्प गुजरातला गेला आहे. नागपूरमध्ये सोलर पॅनल प्रकल्प येणार होता. या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रात १८ हजार कोटींची गुंतवणूक होणार होती. राजकीय आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची माहिती पुढे आली आहे”, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
‘हिंदू-मुस्लीम वाद, जीभ कापा-जिभेला चटके द्या, पक्ष फोडा, आमदार पळवा, सतत असे निरर्थक उद्योग करणारं महायुती सरकार महाराष्ट्रात असल्यामुळे जगभरातील कॉर्पोरेट कंपन्या आणि उद्योगांना राज्यात उद्योग करणं कठीण झालं आहे. त्यामुळे हा प्रकल्प गुजरातेत गेल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?- देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आमचा विरोधी पक्ष सातत्याने महाराष्ट्राची बदनामी करत आहे रिन्यू पॉवर प्लान्ट महाराष्ट्रातून गुजरातला गेला असा अप्रचार त्यांनी केला. मात्र आता रिन्यू पॉवर प्लान्ट कंपनीने एक निवेदन जारी केलं आहे.
त्याद्वारे त्यांनी सांगितलं आहे की “आम्ही महाराष्ट्रातच आहोत. आम्ही महाराष्ट्रातून कुठेही जाणार नाही. उलट आम्ही येथील गुंतवणूक वाढवणार आहोत. आम्ही राज्याला एक वचन दिले आहे, जे तंतोतंत पाळणार आहोत’. रिन्यू पॉवर प्लान्टच्या या निवेदनामुळे विरोधी पक्ष तोंडावर पडला आहे”.