काँग्रेस नेत्यांनी थेट मुख्यमंत्रिपदाचा दावा करू नये, अजून जागावाटप बाकी आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या, असा दावा देखील ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
इतकंच नाही तर कुणाला मोठा भाऊ आणि लहान भाऊ अशी खुमखुमी असेल तर ती महाराष्ट्रातील जनता आगामी निवडणुकीत उतरवून दाखवेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे. यामुळे महाविकास आघाडीत आणखीच वादाचे फटाके फुटण्याची शक्यता आहे. राज्यात विधानसभेची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.
त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रिपदावरून उलटसुलट चर्चा सुरु आहेत. अशातच काल काँग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री काँग्रेसचा होणार असे विधान केले होते. त्यावरुन आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, तिसरी आघाडी झाली तर ती केवळ सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी आहे. कारण ही आघाडी विरोधकांची मत फोडेल. महाविकास आघाडीची लवकरच जागावाटप बैठक होत आहे.
लोकसभेच्या जागावाटपावेळी कोल्हापूरची जिंकलेली जागा आम्ही काँग्रेसला दिली. रामटेक अमरावतीची जागाही आम्ही त्यांना सोडली. काँग्रेस नेते जर ते विसरत असतील तर हे योग्य नाही.
वरिष्ठ नेते अशा प्रकारच्या भूमिका घेणार नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर आत्मविश्वास सर्वांचाच वाढलेला आहे. तीनही पक्षांना एकत्र राहावे लागेल. महाविकास आघाडी घट्ट झाल्याशिवाय आत्मविश्वास वाढणार नाही. लोकसभा निवडणुकीवेळी जागावाटप करणे सोपे होते. आज आमची सर्वांना सामावून घेण्याची भूमिका आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.