HIGH COURT : विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा दावा करू शकत नाही…

Photo of author

By Sandhya

High Court

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मोठी टिप्पणी केली आहे. विवाहित महिला लग्नाच्या बहाण्याने तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप इतर कोणत्याही व्यक्तीवर करू शकत नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. न्यायमूर्ती मनीष पितळे यांच्या खंडपीठाने बलात्कार प्रकरणात अटक केलेल्या पुण्यातील तरुणाला जामीन मंजूर करताना ही टिप्पणी केली.

न्यायालयाने म्हटले आहे की, जेव्हा महिला आधीच विवाहित आहे, तेव्हा ती असा आरोप करू शकत नाही की लग्नाचे आश्वासन देवून कोणीतरी तिच्यावर बलात्कार केला.

संबंधित महिलेला माहित असले पाहिजे की ती त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही. एखाद्या प्रकरणात आरोपीसुद्धा विवाहित असला तरी लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचे प्रकरण खरे ठरत नाही, असे न्यायालयाने नमूद केले.

प्रकरण काय? पुण्यातील विशाल नागनाथ शिंदे नावाच्या तरूणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तो स्वतः विवाहित आहे. बलात्काराचा दावा केलेल्या महिलेचे म्हणणे आहे की, दोघांमध्ये आधी मैत्री झाली आणि नंतर नागनाथने लग्नाच्या आमिषाने तिच्यावर बलात्कार केला. दोघांचे प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, असा आरोपही तिने केला होता.

मात्र नागनाथ याच्याकडे कोणताही व्हिडीओ असल्याचा पुरावा आतापर्यंत सापडला नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. शिंदे याच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले की, ते तपासात पूर्ण सहकार्य करत आहेत. पोलिसांनी बोलावल्यावर शिंदे यांना पोलीस ठाण्यात हजर राहावे लागेल, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याशिवाय तपासासाठी मोबाईल फोन जमा करावा लागेल, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

Leave a Comment