हरियाणा, जम्मू काश्मीरच्या निवडणुकांसोबत महाराष्ट्र आणि झारखंडच्याही निवडणुका व्हायला हव्या होत्या. मात्र पंतप्रधानांना प्रचारासाठी सोईचे वेळ नसल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या, अशी घणाघाती टीका शिवसेना शिंदे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केली. मुंबईमध्ये ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरही तोफ डागली.
काय म्हणाले संजय राऊत? “येत्या दोन चार दिवसांमध्ये आचारसंहिता लागणार आहे, असं सत्ताधारी सांगत असतील तर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेऊ, कारण भारतीय जनता पक्ष सांगेल तसेच होणार आहे. आमची निवडणुकांची तयारी पुर्ण झाली आहे. फक्त इव्हीएम कुठे दाबून ठेवले आहेत, बंददाराआड काय घोटाळे सुरु आहेत, याची आम्हाला चौकशी करावी लागेल,” असेही संजय राऊत म्हणाले. “महायुतीमध्ये कधीही आलबेल नव्हतं.
फक्त शिवसेना राष्ट्रवादी तोडण्यासाठी, फोडण्यासाठी हे अघटित सरकार स्थापन केले गेले. पहिल्या दिवसापासून मारामाऱ्या, हाणामाऱ्या सुरु होत्या. फडणवीसांना कोणी विचारत नाही, अमित शहा सध्या मुख्यमंत्र्यांच्या प्रेमात आहेत. मात्र हे प्रेम नसून अफेयर आहे, हे कधीही तुटू शकतं. तूम्ही आतमध्ये कॅमेरे लावले पाहिजेत, तुम्हाला अजून भयंकर माहिती कळेल,” अशी खोचक टीकाही संजय राऊत यांनी केली.
“लाडकी बहीण योजना ही राजकीय प्रेरित आहे. महायुतीमध्ये सगळे मिस्टर फॉर्टी परसेंट आहेत. हे सरकार पहिल्यापासून एकमेकांच्या छाताडावर बसले आहे. राज्याला काय मिळणार? या कमिशन बाजीमुळे यांचे पटत नाही. मग महाराष्ट्राला काय मिळणार? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर इतर राज्यातील निवडणुकांचा खर्च करण्यासाठी दबाव आहे.
हरियाणामधील निवडणुकीचा खर्चही मुख्यमंत्र्यांनी केला. म्हणजे राज्याला लुटा आणि दिल्लीत पाठवा, असे काम सुरु आहे…” असेही संजय राऊत म्हणाले. “शिवसेनेचा दसरा दसरा मेळावा हा शिवतर्थावर पार पडत आहे. उद्धव ठाकरे हे उद्या विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकतील, त्याआधी शिवसेनेच्या दोन्ही दसरा मेळाव्या आधी राज ठाकरे हे देखील जनतेशी आहेत.
यावरुनही संजय राऊत यांनी मनसे अध्यक्षांवर तोफ डागली. सुसंस्कृत, प्रगत महाराष्ट्र घडवायचं असेल तर सध्याचे घटनाबाह्य, सैतानी सरकारचे गोडवे गाणे बंद करा. जर खरोखरच या राज्यातील नेत्यांना सुसंस्कृत राज्य बनवायचे असेल तर मोदी शाह यांची चाटूगिरीबंद करा,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.