PUNE CRIME : वाहतूक कोंडी सोडविणार्‍या पोलिसांना कोयत्याचा धाक…

Photo of author

By Sandhya

वाहतूक

वाहतूक कोंडी सोडविणार्‍या पोलिसांना शिवीगाळ करून कोयत्याचा धाक दाखविण्यात आल्याची घटना कोंढवा भागात घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एका दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी महेश लोणकर याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस (Police) शिपाई किरण झेंडे यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई झेंडे आणि मेमाणे कोंढव्यातील शिवनेरीनगर परिसरात बुधवारी रात्री गस्त घालत होते. त्या वेळी शिवनेरीनगर परिसरात कोंडी झाली होती. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी झेंडे आणि मेमाणे गेले. त्या वेळी गर्दीत कोयता उगारून आरोपी महेश लोणकर वाहनचालकांना धाक दाखवत होता.

या भागातील रहिवाशांना त्याने शिवीगाळ केली. या घटनेची माहिती मिळताच झेंडे आणि मेमाणे तेथे गेले. पोलिसांनी कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पोलिसांना पाहताच लोणकरच्या पत्नीने त्याच्याकडील कोयता काढून घेऊन लपवला.

कोंडी सोडवणार्‍या पोलिसांना शिवीगाळ, तसेच धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणकर याच्यासह त्याच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी घटनास्थळी भेट दिली.

Leave a Comment