जिथे आपले उमेदवार निवडून येतील, तिथे उमेदवार उभे करावे. शिवाय राखीव प्रवर्गात आपण उमेदवार देऊ नये, जो आपल्या विचारचा आहे, त्याला निवडून आणावे, असे आवाहन करत मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे जाहीर केले. तसेच मराठा समाजाने १०० टक्के मतदान करावे.
सर्व मराठी एक राहील्यास आपला विजय असेल, असा दावाही त्यांनी यावेळी केला. जालना येथील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत महायुती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा निशाणा साधला.
मनोज जरांगे म्हणाले, आम्ही सरसकट सर्व जागांवर उमेदवार उभे करणार नाहीत. मात्र सर्वांकडून अर्ज भरून घेणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोणाचे अर्ज मागे घ्यायचे ते आपण ठरवू. माझी निवडणुकीची किंवा राजकारणाची भूमिका नाही. निवडणुकीच्या नादात आंदोलनापासून दुर जावू नका, असेही जरांगे यावेळी म्हणाले.
आपण उमेदवार उभे केले तर भाजपवाले खुश होतील. नाही केले तर महाविकास आघाडीवाले खुश होतील. मात्र ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी मैदानात उतरावे. गरजवंत मराठ्यांना राजकारणाची गरज नाही. राजकारणासाठी आमचा संघर्ष नाही. कधी काळी मुलांसाठी आम्ही उठाव केला होता.
मात्र, देवेंद्र फडणवीस हवालदार आहेत. आपल्याला सत्ता परिवर्तन करायचे आहे, धर्मपरिवर्तन नाही. मी शिवरायांचे हिंदुत्व मानतो. मराठ्यांना माझे आव्हान आहे की, कोणाचे ऐकून कोणाशी भांडायचे नाही. शिंदे समितीला 8 हजार पुरावे सापडले, 14 महिने त्यांनी मागणी पूर्ण केली नाही. भाजपमध्ये काही चांगले लोक आहेत. भाजपचा दोष नाही, येथून मागे काय ते आपले शत्रू होते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, एकूण किती जागांवर हे उमेदवार असतील हे मात्र असूनही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा समाजाचे किती उमेदवार रिंगणात दिसतात हे पाहावे लागेल. शिवाय उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी किती अर्ज मागे घेतले जातात. त्यात कोणाला समर्थन दिले जाते हे ही उत्सुकतेचे असेल. निवडणुकीची त्रिसूत्री
1. जी जागा जिंकून येऊ शकते अशा ठिकाणी उमेदवार उभे करणार. 2. एससी आणि एसटी राखीव जागांवर जो आपल्याशी बांधील असेल त्यांना आपण पाठिंबा द्यायचा. 3. जिथे उमेदवार देणार नाहीत, तिथे जो बॉण्डवर शपथपत्र लिहून देईल की मराठा समाजाला आरक्षण देणार, त्याला आपण साथ देऊ.