काँग्रेसला लोकसभेला महाराष्ट्रात चांगलं यश मिळालं. पण, विधानसभेची निवडणूक लागली तरी काँग्रेसचे नेते मुद्दे घेऊन लोकांपर्यंत जाताना दिसत नसल्याचे चित्र आहे. याचबद्दल माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भूमिका मांडताना काँग्रेसकडून होत असलेल्या चुकीवर बोट ठेवलं.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘लोकमत’ला विशेष मुलाखत दिली. लोकमत व्हिडिओचे संपादक आशिष जाधव आणि लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी ही मुलाखत घेतली.
काँग्रेसचे जे नेते आहेत, विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते आहेत. नाना पटोले प्रदेशाध्यक्ष आहेत. बाळासाहेब थोरात जेष्ठ नेते आहेत. हे लोकं हे विषय का बोलत नाहीत? असा प्रश्न पृथ्वीराज चव्हाणांना विचारण्यात आला. काँग्रेसची रणनीती कुठे फसतेय? पृथ्वीराज चव्हाणांनी मांडला मुद्दा प्रश्नाला उत्तर देताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “ते बोलताहेत की नाही, मी बघितलं नाही. काय झालं की, काही जणांनी निवडणुकीच सूत्रसंचलन करण्यासाठी मुंबईला राहिले पाहिजे.
नागपूरला बसून राहिले पाहिजे. आणि संपूर्ण भागाचं सूत्रसंचलन केलं पाहिजे. पण, सगळेच उभे राहिले की, इथे कुणीच नसतं. आणि ही चूक जी आहे, ती मध्य प्रदेशमध्ये झाली, आमच्या काँग्रेस पक्षाची. राजस्थानमध्ये झाली. हरयाणामध्ये झाली आणि आता इथेही (महाराष्ट्र) होतेय”, असे स्पष्ट मत पृथ्वीराज चव्हाण यांनी मांडले.
“आता समजा तुम्हाला एकाला मुख्यमंत्री करायचे… त्याला कानात सांगा ना. तू मुख्यमंत्री आहे, तू उभं राहायचं नाही. तू प्रचार कर”, अशी भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकमतशी बोलताना मांडली. हरयाणासारखंच महाराष्ट्रात होईल का? पृथ्वीराज चव्हाणांचा अंदाज काय? हरयाणातील पराभवाच्या मुद्द्यावर ते म्हणाले, “त्याचं विश्लेषण पक्ष करतोय. समिती नेमली आहे. त्यामध्ये चुका नक्की झाल्या. मी पण हरयाणाचा प्रभारी होतो, एका निवडणुकीमध्ये. कदाचित जाट मते एका बाजूला झाली आणि त्याच्याविरोधात विना जाट गट झाला.”
हरयाणात आपसातील मतभेदांमुळे पराभव झाला, अस बोललं जातंय. महाराष्ट्रात असं होणार नाही, म्हणून काँग्रेसनं काय केलं पाहिजे. यावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्रात असं होणार नाही. कारण तिथं आमच्या एक दलित नेत्या आणि जाट नेते होते, त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला असं चित्र समोर आलं. खरं खोटं मला माहिती नाही.”
“महाराष्ट्रात भाजपाकडून ओबीसी-मराठा हा वाद निर्माण केला गेला आहे. हिंदू दलित आणि बौद्ध दलित हा वाद निर्माण केला गेला आहे. आणि यातून मग एखादा पक्ष आपल्याबरोबर येईल, अशी कल्पना आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं अतोनात नुकसान होतंय”, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.