BIG NEWS : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी…

Photo of author

By Sandhya

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

 महायुतीतील प्रमुख तिन्‍ही घटक पक्षांकडून उमेदवार जाहीर करण्‍यात आल्‍यानंतर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणाला संधी देण्यात येणार हा प्रश्न होता. या प्रश्नावर उत्तरे मिळाली असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

जाहीर करण्‍यात आलेल्‍या या यादीत आदित्य ठाकरे, वरुण सरदेसाई, राजन विचारे, अद्वय हिरे, महेश सावंत यांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजिवडातून नरेश मणेरा, ऐरोलीतू एम. के. मढवी, मागाठाण्यातून उद्देश पाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

२००९ पासून कोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे आमदार आहेत. परंतु, २०२२ मध्ये झालेल्या शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन प्रमुख गट पडले. त्यामुळे एकनाथ शिंदेंविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष होते. याच जागेवरून उद्धव ठाकरे यांनी हुक्कमी एक्का उभा केला आहे.

यादीत मुंबई, ठाणे, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये बहुतांश आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही नव्या उमेदवारांना सुद्धा संधी देण्यात आली आहे. ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीनुसार, उन्मेष पाटील यांना चाळीसगाव येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

पाचोऱ्यात शिंदे गटाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्याविरोधात ठाकरे गटाकडून त्यांच्याच चुलत बहीण वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ज्यामुळे या मतदारसंघातील लढत प्रचंड चुरशीची होणार आहे.

मुंबईमधून एकूण 13 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. तर, जोगेश्वरी पूर्व येथून अनंत नर यांना उमेदवारी जाहीर झाली असून खासदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर या शिवसेना शिंदे गटाकडून निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघाकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे. 

Leave a Comment