सुषमा अंधारे : “सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले, हा विचार मनुवादी….”

Photo of author

By Sandhya

सुषमा अंधारे

संगमनेरच्या धांदरफळ बुद्रूक येथे युवा संकल्प मेळाव्यात माजी खासदार डॉ. सुजय विखे-पाटील यांची सभा पार पडली. या कार्यक्रमाचे अध्यक्ष असलेल्या वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्यावर टीका केली.

सुजय विखे हे मंचावर असतानाच वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याबद्दल अपमानास्पद विधान केलं. देशमुखांच्या या विधानानंतर संगमनेर तालुक्यात तणावाची परिस्थिती निर्माण झाली.

सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. दुसरीकडे, ज्यांनी हे वक्तव्य केलं त्यांना शिक्षा मिळायला हवी असं जयश्री थोरात यांनी म्हटलं आहे.

याच दरम्यान आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. “सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले करणे यातून पुरुषी अहंकाराने पछाडलेली सरंजामी मानसिकता दिसते” असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे. 

सुषमा अंधारे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. “जयश्री थोरात, स्नेहल जगताप,सुप्रिया सुळे, सुषमा अंधारे ही नावे निमित्त मात्र आहेत.

सत्ताधाऱ्यांकडून बाईपणावर हल्ले करणे यातून पुरुषी अहंकाराने पछाडलेली सरंजामी मानसिकता दिसते. बाईच्या हातात फक्त पाळण्याची दोरी असावी राजसत्तेची दोरी तिने कधी हातात घेऊच नये हा विचार मनुवादी आहे” असं सुषमा अंधारे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

धांदरफळ येथील सभेत वसंतराव देशमुख यांनी अश्लाघ्य भाषेत जयश्री थोरात यांच्याबाबत भाष्य केलं. भाषणानंतर सभेच्या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुजय विखे बॅनर फाडत आपला निषेध नोंदवला.

तर सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडण्यात आल्या. त्यानंतर जयश्री विखे यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी कारवाईसाठी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. त्यानंतर बोलताना जयश्री थोरात यांनी सुजय विखे आणि वसंतराव देशमुख यांच्यावर जोरदार टीका केली. 

Leave a Comment

You cannot copy content of this page