महाविकास आघाडीचे सरकार आले तर मला जेलमध्ये टाकणार आहेत. तुम्ही मला जेलमध्ये टाकणार्यांचे आणि तुम्हाला लखपती करणार्या योजना बंद करणार्यांचे सरकार आणणार काय? अशी भावनिक साद घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोपरी – पाचपाखाडी मतदारसंघात सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
लाडक्या बहिणी, भावांनी आणि मतदारांनी निवडणूक हातात घेऊन विक्रमी मताधिक्याने विजय मिळवून देण्याचा शब्द दिल्याबद्दल तुमचे आभार मानतो. ही उमेदवारी अर्ज भरण्याची नव्हे, तर विजयाची मिरवणूक असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर मिरवणुकीचे सभेत रूपांतर झाले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही मला विक्रमी मतांनी विजयी करून विरोधकांची अनामत रक्कम जप्त कराल याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. मात्र, कोणीही गाफील राहू नये. प्रत्येक मत महत्त्वाचे आहे.
तुम्हाला कल्याणकारी योजना सुरू ठेवायच्या असतील तर महायुतीला मतदान करणे आवश्यक आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजेत. कोणीही आम्हाला हलक्यात घेऊ नये, असा इशाराही शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह विरोधकांना दिला. यावेळी खासदार नरेश म्हस्के, खासदार श्रीकांत शिंदे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते.