महायुतीला मत दिल्यास लाडक्या बहिणींना दोनशे रुपये किलो या किंमतीने तेल खावे लागेल अशी टीका माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. दहा, पंधरा, वीस रुपयांची वाढ करणे ठीक आहे.
मात्र थेट शंभर रुपयांवरून दीडशे रुपये किलो तेलांची किंमत केल्यास सामान्यांच्या खिशाला हे परवडणारे नाही. त्यामुळे या सरकारला लाज वाटायला पाहिजे अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
सध्या राज्यात महागाईचा भडका उडाला आहे. इंधनासह, रोजचा भाजीपाला आणि तेलाच्या किंमती मोठ्याप्रमाणात वाढल्या आहेत. या सर्वांत महिलांना आर्थिक सहाय्य म्हणून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली.
लाडकी बहीण योजनेचा अनेक महिलांना लाभ देखील मिळाला. मात्र ही योजना निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केल्याची टीका विरोधकांकडून केली जात आहे.
त्यावरून आणि वाढलेल्या महागाईवरून खडसेंनी लाडक्या बहिणी असा उल्लेख करत महायुतीला मत दिल्यास काय होईल याची आठवण करून दिली आहे. महागाईला आळा घालणं हे सरकारचं काम आहे.
मात्र सरकार फोडाफोडीच्या राजकारणात व्यस्त आहे. या फोडाफोडीमुळे त्यांनी अमाप पैसा कमवण्याचा गंभीर आरोप ही एकनाथ खडसे यांनी सत्ताधाऱ्यांवर केला आहे.