राजकीय पदाधिकाऱ्याची समयसूचकता निमोणे – शिरुर येथून कारेगावकडे जात असताना न्हावरे फाटा येथे एका महिलेने एका राजकीय पदाधिकाऱ्याकडे लिफ्ट मागितली. गाडीतून घेऊन गेल्यानंतर रांजणगाव येथे त्या महिलेला सोडल्यानंतर तिने पदाधिकाऱ्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पदाधिकाऱ्याने समयसूचकता दाखविल्याने ती महिला गर्दीतून पसार झाली.
रविवार (दि २४) दुपारी दोनच्या सुमारास हे पदाधिकारी कारेगावकडे येत होते. त्यावेळी ‘त्या’ महिलेने विचारले तुम्हाला कुठे जायचं आहे. त्यावेळी ‘या’ राजकीय व्यक्तीने कारेगावला जायचे असल्याचे सांगितले. ‘ती’ महिला गाडीत बसली. कारेगावात आल्यानंतर महिलेने मला उशीर झालाय, मला रांजणगावला सोडा, अशी विनंती केली.
त्या व्यक्तीने तिला रांजणगाव येथील ‘महागणपती’ च्या पार्किंगजवळ सोडले. गाडीतन उतरल्यानंतर ‘त्या’ महिलेने राजकीय व्यक्तीला तुमच्याकडे २०० रुपये सुट्टे पैसे आहेत का? अशी विचारणा केली. तेव्हा ‘ त्या’ व्यक्तीने पैसे नाहीत, असे सांगितले. नंतर महिलेने गयावया केल्यानंतर त्याने पाकिट उघडून ‘त्या’ महिलेला २०० रुपये सुट्टे दिले.
पाकिटात पैसे असल्याचे पाहताच ‘त्या’ महिलेने मला ते पैसे दे, असे म्हणत, तू माझी लिफ्टच्या बहाण्याने छेडछाड केल्याचा ‘कांगावा’ करीत ओरडायला सुरवात केली. फोन लावत ‘साहेब लवकर या’ एकाने माझी छेड काढली आहे, असे सांगत कोणाला तरी बोलावलं. त्या व्यक्तीने समयसूचकता दाखवत गाडीतून उतरत त्याच्या मित्रांना फोन करुन ‘एक अनोळखी महिला मला ‘ब्लकमेल’ करीत असल्याचे सांगितले.
‘ती’ महिला घाबरली. हा खोटा प्रकार आपल्याच अंगलट आल्याचे लक्षात आल्यानंतर तिने गणपती मंदिराच्या परिसरातून धूम ठोकली. रविवारी अनेक भाविक ‘महागणपती’ च्या दर्शनाला आल्याने गर्दीचा फायदा घेत महिला पसार झाली. सुमारे तासभर परिसरात महिलेचा शोध घेतला. पण तोपर्यंत ती पसार झाली होती.
मुझको भी, लिफ्ट करा दो शिरुर तालुक्यात अनेक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहे. पुणे – नगर महामार्गावर लिफ्ट मागण्याच्या बहाण्याने आर्थिक फसवणुकीचे प्रकार समोर येत आहेत. पण ‘उगाच इज्जतीचा पंचनामा नको ‘ या हेतूने अनेकजण पोलीस स्टेशनला जाण्यास घाबरत आहेत. त्यामुळे अनेक युवती आणि महिला या गोष्टीचा फायदा घेत ‘आर्थिक’ फसवणूक करीत आहेत.
परिसरात बंटी आणि बबली याचा वावर वाढला आहे. कथित बबली महिला ही यापूर्वी अनेकांना गंडा घातल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. त्यामुळे मुझको भी लिफ्ट करा दो, ही माणुसकीच्या भावनेतून केलेली मदत अंगलट आणि गंडा घालणारी ठरत आहे. यावर पोलिसांनी कारवाईचा फास आवळावा, अशी मागणी जोर धरत आहे.