महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हे महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे गटासाठी धक्कादायक ठरले होते. या निकालांमधून ठाकरे गटाला अवघ्या २० जागा मिळाल्याने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेला मोठा विजय आणि ठाकरे गटाच्या झालेल्या पिछेहाटीवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. उद्धव ठाकरे यांची अवस्था ही शोले चित्रपटामधील असरानीसारखी झाली आहे, असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची अवस्था ही छोले चित्रपटातील असरानीसारखी झाली आहे. मी तुम्हाला ठामपणे सांगतो की उद्धव ठाकरे यांचे निवडून आलेले जे २० आमदार आहेत.
त्यापैकी दोन सोडून १८ आमदारांना उद्धव ठाकरे जे काही सांगतात ते पटत नाही. त्यामुळे या २० आमदारांपैकी २ आमदार राहतील, बाकीचे पळून जातील, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाची विधानसभा निवडणुकीत पीछेहाट झाली आहे. ठाकरे गटाचे केवळ २० आमदार निवडून आले आहेत.
ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या कोकणामधून त्यांचा केवळ १ आमदार निवडून आला आहे. तर मुंबईतून १० आमदार निवडून आले आहेत. उर्वरित राज्यभरातून ठाकरे गटाच्या केवळ ९ उमेदवारांचा विजय झाला आहे.