महायुती सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव राहिलेले ज्येष्ठ सनदी अधिकारी श्रीकर परदेशी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव म्हणून काम पाहणार आहेत.
श्रीकर परदेशी यांनी पुण्याच्या बी.जे. मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि एमडीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ते आयएएस अधिकारी झाले. त्यांनी यवतमाळ, अकोला, आणि नांदेड जिल्हाधिकारी म्हणून उल्लेखनीय कामगिरी केली. नांदेड जिल्ह्यातील जलसंवर्धनासाठी त्यांना पंतप्रधान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
तसेच, ते पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणूनही कार्यरत राहिले आहेत. २०१५ मध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयात रुजू होऊन ग्रामीण, नागरी, जलसंपत्ती, कृषी, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील धोरणांची आखणी व संनियंत्रणाची जबाबदारी सांभाळली.
श्रीकर परदेशी यांनी २०२१ मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून लोकप्रशासनात पदव्युत्तर शिक्षण घेतले, तर २०२२ मध्ये जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाने त्यांना ‘मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ’ ही पदवी प्रदान केली.
त्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासनाला नवा वेग मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.