महाराष्ट्राचे कुलदैवत व बहुजन समाजाचा लोकदेव असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाच्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता वांग्याचे भरीत बाजरीचा रोडगा,कांद्याची पात, पुरण पोळीचा नैवद्य खंडोबाला दाखवून झाली.
महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर मार्गशीर्ष प्रतिपदेला चंपाषष्ठी उत्सवानिमित्त खंडोबा व म्हाळसा देवीच्या उत्सवमूर्ती ची घट स्थापना करवीर पिठाच्या शंकराचार्य श्री नृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आली होती.
पाच दिवस पूजा अभिषेक, विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रम , वाघ्या मुरळी व लोककलावंतांचा भक्ती गीते, घडशी समाजाचे दिवस रात्र सुमंगल सनई चौघडा वादन, देव दिपावली, तेलहंडा,देवाला टेलवण वड हळद अशा धार्मिक विधी नी सहा दिवस वातावरण मल्हारमय होवून गेले होते.
शनिवार दिनांक 7 रोजी सकाळी महापूजा अभिषेक झाल्या नंतर रंग महालातील खंडोबा व म्हाळसा देवींच्या उत्सव मूर्तींवर पुजारी सेवक वर्ग, विश्वस्त, ग्रामस्थ यांच्या वतीने दुग्ध अभिषेक घालून उत्सव मूर्ती वाजत गाजत मुख्यमंदिरात नेवून देवाचे विधिपूर्वक घट उठविण्यात आले.वांग्याचे भरीत बाजरीचा रोडगा, पुरण पोळीचा नैवद्य दाखवून सहा दिवसांच्या उपासनेची सांगता झाली.
या उत्सवा निमित्त जेजुरी देवसंस्थान व जयमल्हार चंपाषष्ठी अन्नछत्र प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे तीन हजार किलो वांग्याचे भरीत,हजारो भाकरी,तसेच पुरण पोळी व मिष्टान्न चा महाप्रसाद पन्नास हजारहून अधिक भाविकाना देण्यात आला.
पहाटे पासून मानकरी,ग्रामस्थांच्या पूजा अभिषेक जेजुरी गडावर सुरू होत्या. हजारो भाविकांनी खंडोबा देवाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गर्दी केली होती.