वंचितने पाठवलेल्या पत्राला आरओकडून सरकारी उत्तर
मुंबई:
EVM संदर्भात आम्ही सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि EVM संदर्भात एक बैठक बोलवणार आहोत. आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांशी आणि आर. ओ. यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्तांनी अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाही. काही आर. ओ यांनी सरकारी उत्तरे दिली आहेत. पण ७५ लाख मते कशी वाढली याचे उत्तर मिळालेले नाही असे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे की, आम्ही लिहिलेल्या पत्रातील मुद्दे महत्वाचे आहेत. त्यातील पहिला मुद्दा २० तारखेला मतदान किती झाले याची आकडेवारी आणि २३ तारखेला सर्व मतदान जेव्हा मोजण्यात आले त्याची आकडेवारी निवडणूक आयोगाने द्यावी अशी मागणी आम्ही केली आहे. २० तारखेला निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जी माहिती टाकण्यात आली आहे. त्यामध्ये संध्याकाळी सहानंतर 75 लाख मतदान झाले आहे असे सांगण्यात आले आहे. याबाबत आम्ही प्रश्न उपस्थित केला आहे.
सायंकाळी सहानंतर किती मतदान झाले याची आकडेवारी निवडणूक आयोगाने द्यावी. संध्याकाळी सहा वाजता जे रांगेत होते या सगळ्यांना आपण पोलिंग बूथ वाईज स्लीप वाटली असेल, तर त्या किती वाटल्या याची माहिती द्या, कोणत्या अधिकारात आपण या स्लीप वाटल्या आहेत याबाबत माहिती द्या अशी मागणी आम्ही पत्र पाठवून निवडणूक आयोगाकडे केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
नांदेड दक्षिण, औरंगाबाद पश्चिम आणि परंडा येथील आरओनी आमच्या पत्राला सरकारी पद्धतीची उत्तरे दिली आहेत. त्यातील समान भाग म्हणजे सदर माहिती दैनंदिन लिफाफामध्ये सील बंद करून सुरक्षा कक्षात जमा करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत आपल्याला माहिती उपलब्ध करून देणे शक्य नाही. असे आर. ओ यांनी उत्तरे दिल्याचे आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे.
तीनही आरओ यांचे उत्तर समान आहे. त्यामुळे प्रश्न असा होतो की, ७५ लाख मते खरेच झाली होती का ? कायदा असे म्हणतो की, एकदा सायंकाळी ५ वाजून ५९ मिनिटे झाले की, निवडणूक प्रक्रिया थांबवावी लागते, दरवाजे बंद करावे लागतात, जे आत मध्ये आहेत त्यांना टोकन दिले जाते आणि जेवढ्या मतदारांना टोकन असते त्यालाच मतदान करण्याचा अधिकार असतो असे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.
आम्हाला मिळालेले उत्तर आम्ही इतर पक्षांना देखील पाठवणार आहोत. आपल्यातील जे राजकीय मतभेद आहेत ते आपण बाजूला ठेवले पाहिजेत. जर आपण ते बाजूला ठेवले नाही आणि अशाच रीतीने मतदान होणार असेल त्याला काहीही अर्थ राहत नसल्याचे ॲड. आंबेडकर यांनी म्हटले आहे.