
मुंबई : शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले तर आनंदच होईल राज्यातील जनतेला होईल. असे सांगत मी शरद पवार साहेबांना भेटणार आहे, अजितदादाच्या सोबत आल्यापासून त्यांना भेटलो नाही पण आता भेटलो तर लोटांगणच घालीन अशी प्रतिक्रीया अन्न व औषधी द्रव्य प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी आपल्या खात्याचा कार्यभार स्विकारताना दिली. राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल हे कोणालाही सांगता येणार नाही. मात्र शरद पवार आणि अजित पवार एकत्र येतील का, या प्रकारच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र त्यामुळे राजकारणात ट्विस्ट येण्याची शक्यता नाकारण्यात येणार नाही.
राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गटाचे मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की, जसं बजरंगाच्या छातीत प्रभू राम दिसतील, तसं माझ्या छाती फाडली तर शरद पवार दिसतील. अजित पवारांच्या सोबत आल्यापासून मी त्यांना भेटलो नाही आता भेटलो तर लोटांगण घालीन, असे मंत्री झिरवळ म्हणाले. तसेच राष्टवादी कॉग्रेस (अप) गटाचे कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी म्हटलेय की, शरद पवार आमचे दैवत आहेत. काही राजकीय कारणांवरून आम्ही वेगळे जरी झालो असलो तरी मात्र त्यांच्याविषयी आमच्या मनामध्ये आजही आस्था आहे. भविष्यात सुद्धा पवार कुटुंबीय एकत्रच आलं तर यात काही गैर नाही. कारण मी सुद्धा स्वतःलाच पवार कुटुंबाचा एक सदस्य समजतो पवार कुटुंब एकत्र यावं, अशी माझी सुद्धा इच्छा आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सुद्धा त्यांना भेटायला गेलो होतो. अनेकांनी राजकीय तर्कवितर्क लावले. त्यांच्या बरोबरचे संबंध आम्हाला आजही टिकवायचे आहेत, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली. यावरून राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री आशा पवार यांनी आज पंढरपूरात विठुरायाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलताना आपलं कुटुंब पुन्हा एकत्र यावं, अशी भावना व्यक्त केली आहे. तर प्रफुल पटेल म्हणतात शरद पवार अजित पवार एकत्र येणे ही चांगली बाब आहे. यावरून पवार कुटुंब पुन्हा येईल का, अशा प्रकारच्या चर्चा राज्यात सुरू झाल्या आहेत.
बीडमध्ये मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात मंत्री धनजंय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. त्यावरही प्रफुल्ल पटेल म्हणाले की, यात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. त्यात कुणालाही सोडणार जाणार नाही.असे पटेल म्हणाले.