
पुणे : विमाननगर येथील डब्ल्यूएनएस आयटी कंपनीत लेखापाल म्हणून काम करणाऱ्या मित्राने मैत्रिणीवर धारदार चाकूने वार करून खून केला. ही घटना सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.शुभदा शंकर कोदारे (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज, पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर, कात्रज, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. शुभदा आणि कृष्णा एकाच कंपनीत लेखापाल म्हणून नोकरीला होते.
शुभदाने कृष्णाकडून काही रक्कम उसनी घेतली होती. मात्र, पैसे देण्यास टाळाटाळ केल्याने दोघांच्यात वाद झाले होते. सोमवारी सायंकाळी इमारतीच्या पार्किंगमध्ये त्यांच्यात पुन्हा वाद झाले. यातून कृष्णाने धारदार चाकूने शुभदावर वार केले.सुरक्षारक्षकांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असल्याचे पोलिस उपायुक्त हिंमत जाधव यांनी सांगितले.
दरम्यान, आर्थिक देवाण-घेवाणीच्या वादातून नामांकित आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरुणीवर तरुणाने वार केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. शुभदा कोदरे आणि आरोपी कृष्णा कानोजा हे एकमेकांना बऱ्याच काळापासून ओळखत होते. दरम्यान कृष्णाने शुभदाच्या उजव्या कोपऱ्यावर धारदार शस्त्राने वार केला. यावेळी मोठा गोंधळ उडाला. जखमी अवस्थेतच शुभदाला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला.