
मुंबई : राज्यात महायुतीचे सरकार स्थापन दोन महिने व्हायला आले तरी अंतर्गत कुरबुरी थांबण्याचे काही नाव नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाण्याआधी पालकमंत्रिपदाचा विषय मार्गी लावला खरा पण २४ तासांच्या आतच दोन मंत्र्यांच्या नियुक्तीस स्थगिती देण्याची वेळ त्यांच्यावर आली. देवेंद्र फडणवीस यांनी दादा भुसे यांच्यासारख्या जेष्ठ शिवसेना नेत्याला डावलून नाशिकचे पालकमंत्रिपद गिरीश महाजन यांच्याकडे दिले तर भरत गोगावले यांच्यासाठी प्रतिष्ठेचे बनलेले रायगडचे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे देऊन फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांनाच शह दिल्याचे बोलले जात होते. याच सगळ्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांची नियुक्ती करताना भाजपने मनमानी केल्याचे खासगीत सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज होऊन दरेगावी गेले आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची धावपळ सुरू आहे.
महायुतीत पालकमंत्रिपदावरून सुंदोपसुंदी सुरू असून तिन्ही पक्षांत कुरबुरी होत आहेत. फडणवीस-शिंदे-अजित पवार यांनी एकत्र बसून पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत असले तरी नियुक्तीवरून तिन्ही पक्षांमध्ये नाराजी आहे. रायगडसाठी आग्रही असणारे गोगावले आणि नाशिकसाठी आग्रही असणारे दादा भुसे यांच्याकडे संबंधित जिल्ह्याची जबाबदारी न देऊन भाजपने एकनाथ शिंदे यांना शह दिल्याची जोरदार चर्चा होती. यामुळेच एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या बातम्या आल्या.
एकनाथ शिंदे यांनी फोन करून फडणवीसांकडे नाराजी व्यक्त केली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोअसला गेलेले असताना पालकमंत्रिपदांच्या नियुक्त्यांवरून नाराज झालेले एकनाथ शिंदे दरेगावी गेल्याचे सांगितले जाते. तिकडूनच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करून आदिती तटकरे आणि गिरीश महाजन यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली. फडणवीस यांनीही एकनाथ शिंदे यांची नाराजी लक्षात घेऊन दोन मंत्र्यांच्या पालकमंत्रिपदाला स्थगिती दिली.
एकनाथ शिंदे नाराज, भाजप नेत्यांची धावपळ
एकनाथ शिंदे यांनी नाराज होऊन मुख्यमंत्री फडणवीस यांना फोन केला तसेच नाराजीस्तव ते दरेगावी गेल्याचे समजल्यानंतर भाजप नेत्यांची धावपळ सुरू झाली आहे. एकनाथ शिंदे यांची समजूत काढण्यासाठी जावे, असे फडणवीस यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याचेही समजते.
कुरघोडींमधून दोन मंत्र्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीस स्थगिती
महायुती सरकार बहुमताने निवडून आल्यानंतर तब्बल दोन आठवड्यांनी नव्या सरकारचा शपथविधी समारंभ पार पडला. दरम्यानच्या काळात कोणते मंत्री मंत्रिमंडळात असावेत, यावरून बराच खल सुरू होता. मंत्र्यांचा विषय मार्गी लागताच खातेवाटपावरून सुंदोपसुंदी सुरू होती. आता सगळे सुरळीत झाले, असे वाटत असतानाच आता पुन्हा पालकमंत्रिपदावरून महायुतीत कुरघोडींना सुरुवात झाली आहे. त्याच कुरघोडींमधून दोन मंत्र्यांच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीस फडणवीस यांनी स्थगिती दिली आहे