महाकुंभ मेळ्यासाठी जाताना अपघात | बांधकाम व्यावसायिकासह तिघांचा मृत्यू

Photo of author

By Sandhya


पिंपरी: महाकुंभ मेळ्यासाठी जात असलेल्या बांधकाम व्यावसायिकांच्या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक बांधकाम व्यावसायिक, त्याची पत्नी आणि एक अन्य महिलेचा मृत्यू झाला, तर एक व्यक्ती गंभीर जखमी झाला. हा अपघात मध्यप्रदेशातील जबलपूरजवळ शनिवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडला.

मृत्यू झालेल्यांमध्ये विनोद नारायण पटेल (५०), शिल्पा विनोद पटेल (४७, दोघे रा. स्पाईन सिटी चौक, एमआयडीसी भोसरी) आणि निरू नरेशकुमार पटेल (४८, रा. भेळ चौक, प्राधिकरण निगडी) यांचा समावेश आहे. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव नरेशकुमार रवजी पटेल (४८, रा. भेळ चौक, प्राधिकरण निगडी) आहे.

नरेशकुमार पटेल आणि विनोद पटेल हे एकमेकांचे मित्र होते. नरेशकुमार आणि त्यांची पत्नी निरु तसेच विनोद आणि शिल्पा हे चौघेही प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी इनोव्हा (क्र. एमएच १४ केएफ ५२००) या कारने जात होते. त्यावेळी त्यांच्या कारने मध्यप्रदेशातील जबलपूरजवळ महामार्गावरील पुलाच्या कठड्याला धडक दिली. या अपघातात विनोद, शिल्पा आणि निरु यांचा मृत्यू झाला.

अपघातानंतर कार पुलाच्या कठड्याला धडकून चक्काचूर झाली आणि मोठा आवाज झाला. स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि क्रेनच्या साह्याने कार बाजूला घेतली.

कुटुंबातील दु:ख

विनोद आणि शिल्पा पटेल यांना एकुलता एक मुलगा प्रेम आहे, ज्याचा विवाह महिन्याभरापूर्वी झाला होता. त्यामुळे या दाम्पत्याला आनंदात असताना काळाने घाला घातला. नरेशकुमार आणि निरु यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे, ज्यांची मोठी मुलगी विवाहित आहे.

बांधकाम क्षेत्रातील हळहळ

विनोद पटेल यांचा तुलसी ग्रुप आणि नरेशकुमार यांचा नेक्सस ग्रुप नावाने बांधकाम व्यवसाय आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील बांधकाम क्षेत्रात त्यांची ख्यातनाम ओळख आहे. या अपघातामुळे बांधकाम क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment