पुणे | ‘महिला सन्मान योजने’चा दमदार प्रभाव! पुणे विभागात एसटी प्रवाशांच्या संख्येत मोठी वाढ

Photo of author

By Sandhya

पुणे : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये ‘महिला सन्मान योजनें’तर्गत महिलांना तिकिटाच्या दरात ५० टक्के सवलत सरकारकडून दिली जात आहे. या योजनेचा पुणे विभागात चार कोटी महिलांनी आतापर्यंत लाभ घेतल्याचे आकडेवारी सांगते. त्यामध्ये फक्त सन २०२४ मध्येच अडीच कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेऊन एसटीतून प्रवास केला आहे. या योजनेमुळे पुणे विभागाच्या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे.

करोना आणि एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलनामुळे प्रवासी एसटीपासून दुरावले होते. एसटी यंत्रणादेखील विस्कळित झाली होती. त्यामुळे प्रवाशांची संख्या खूपच कमी झाली होती. एसटीकडे प्रवासी येण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता होती. त्या वेळी सरकारने ७५ वर्षांच्या पुढील नागरिकांना मोफत एसटी प्रवास देणारी ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ आणि महिलांना ५० टक्के तिकीटामध्ये सवलत देणारी ‘महिला सन्मान योजना’ सुरू केली.

एसटी महामंडळाने १७ मार्च २०२३ पासून ‘महिला सन्मान योजना’ सुरू केली आहे. या योजनेला महिलांचा भरभरून प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. एसटी महामंडळाकडे गाड्यांची संख्या कमी असतानादेखील पूर्वीची प्रवासी संख्या ओलांडली आहे. पुणे एसटी विभागात २०२४ मध्ये दोन कोटी ५८ लाख ६२ हजार ४२ महिलांनी महिला सन्मान योजनेचा लाभ घेतला, तर योजना सुरू झाल्यापासून डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत चार कोटी ५९ लाख ८३ हजार ८१३ महिलांनी लाभ घेतला आहे.

६० ते ७० हजारांनी प्रवासी वाढले
एसटी संप आणि करोनानंतर एसटी पुणे विभागाची प्रवासी संख्या एक लाखापर्यंत खाली होती. सरकारने प्रवाशांसाठी योजना सुरू केल्यानंतर एसटीकडे प्रवासी संख्या वाढू लागली. ‘महिला सन्मान’ योजनेमुळे महिलांसोबत पुरुषांची प्रवासी संख्या वाढली. आता पुणे एसटी विभागाची प्रवासी संख्या पावणेदोन लाखांच्या पुढे गेली आहे. एसटी बसची संख्या वाढल्यानंतर दिवसाला प्रवासी संख्या दोन लाखांवर जाण्याची शक्यता आहे.

७२ लाख ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास
‘अमृत ज्येष्ठ नागरिक’ योजनेंतर्गत १५ ऑगस्ट २०२२ पासून सर्व प्रकारच्या बसमध्ये सवलत लागू आहे. या योजनेला चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. पुणे विभागात २०२४ मध्ये ७२ लाख ३ हजार १४२ ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला, तर योजना सुरू झाल्यापासून डिसेंबर २०२४ अखेर एक कोटी ४० लाख २८ हजार ७६४ ज्येष्ठांनी या योजनेचा लाभ घेतला.

प्रवासी संख्या (वर्ष २०२४)
महिना -ज्येष्ठ नागरिक योजना -महिला सन्मान
जानेवारी- ५,२९,६२९ —१९,९८,५२४
फेब्रुवारी- ५,५८,१८८ —२०,१४,८६४
मार्च- ६,४६,०३६ —२,२१,४०३
एप्रिल- ६,३२,५८० —२३,३३,११२
मे- ६,१४,९८१ —२३,३८,८५७
जून- ६,८९,६२८ —२०,१७,९३२
जुलै- ७,०६,२६२ —२१,०९,४२२
ऑगस्ट- ६,९८,२३८ —२३,४६,४८४
सप्टेंबर- ४,८६,७८९ —१९,७६,९३५
ऑक्टोबर- ५,५४,७०० —२१,१९,६७४
नोव्हेंबर- ५,२५,३०८ —२१,२८,७४९
डिसेंबर- ५,६०,८०३ —२२,६६,०८६

Leave a Comment