महाराष्ट्र केसरी २०२५ स्पर्धा सामना वादग्रस्त ठरली, डबल महाराष्ट्र केसरी असलेल्या शिवराज राक्षे याने रागाच्या भरात पंचांना लाथ मारली. पंचांनी चुकीचा निर्णय दिल्याचा दावा त्याने केला. उपांत्य फेरीमध्ये गादी विभागाच्या अंतिम फेरीमध्ये शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात लढत झाली होती. मोहोळने टाकलेल्या ढाक डावाने शिवराज खाली पडला पण त्याची पूर्ण पाठ न टेकलेली नसताना पंचांनी मोहोळला विजयी केले. त्यामुळे संतापलेल्या राक्षेने पंचाची कॉलर ओढली आणि लाथ मारली. त्यानंतर अंतिम सामन्यामध्ये महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात काँटे की टक्कर पाहायला मिळाली. शेवटच्या मिनिटामध्ये मोहोळला एक गुण दिल्याने त्यावर महेंद्रने आक्षेप घेतला, शेवटी त्याने १६ सेकंद बाकी असताना मैदान सोडले. त्यामुळे पंचांच्या निर्णयाला डावलून त्याने मैदान सोडल्याने महेंद्र आणि शिवराज राक्षे या दोघांवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष रामदास तडस यांनी माहिती दिली.
नेमकं काय घडलं?
पृथ्वीराज आणि शिवराज यांच्यातील अंतिम लढतीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. पृथ्वीराजने राक्षेला चितपट केले. मात्र, राक्षेला हा निर्णय मान्य नव्हता. त्याच्या मते त्याची पाठ पूर्णपणे टेकलेली नव्हती. यामुळे पंचांच्या निर्णयावर राक्षेसह त्याचे प्रशिक्षक, हितचिंतकांनी आक्षेप घेऊन निर्णयाविरोधात तांत्रिक समितीकडे अपिल केले. नियमानुसार कुस्ती चितपट झाल्यास त्या निर्णयावरील अपिल स्वीकारले जात नाही. यामुळे या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. या वेळी राक्षे पंचांवर प्रचंड चिडला होता. त्याने एका पंचांना थेट लाथ मारली. त्यामुळे स्पर्धा काही काळ थांबली होती. याबाबत राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. राक्षे ‘डबल महाराष्ट्र केसरी’ आहे. त्याचबरोबर अंतिम लढतीच्या निकालानंतर पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड आणि त्याच्या हितचिंतकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना मैदानातून बाहेर काढले. महेंद्र गायकवाडवरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आल्याचे समजते.
किताबी लढतीत निळी जर्सी घातलेल्या महेंद्रने सुरुवातीला आक्रमक पवित्रा घेतला. मात्र, त्याच ताकदीने पृथ्वीराजने प्रतिकार करून गुण घेऊ दिला नाही. दरम्यान ३० सेकंदाच्या कालावधीत महेंद्रने गुण न घेतल्याने पृथ्वीराजला १ गुण देण्यात आला. या गुणाच्या आधारे पृथ्वीराजने पहिल्या फेरीत एक गुणांची आघाडी घेतली. दुसऱ्या फेरीत पृथ्वीराजच्या निष्क्रियतेचा महेंद्रला एक गुण देण्यात आला आणि १-१ अशी गुणांची बरोबरी झाली. अवघा शेवटचा एकच मिनिट शिल्लक असताना डाव करण्याच्या नादात महेंद्र मॅटच्या बाहेर गेल्याने पृथ्वीराजला १ गुण देण्यात आला. शेवटचे ३० सेकंद शिल्लक राहिले. महेंद्रनेही गुणासाठी अपील केले. मात्र, ते फेटाळून लावण्यात आले. शेवटचे काही सेकंद असताना महेंद्रने मैदान सोडल्याने पंचांनी पृथ्वीराजला विजयी घोषित केले. पृथ्वीराजला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाची चांदीची गदा आणि ‘थार’ चारचाकीची चावी प्रदान करण्यात आली. या प्रसंगी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राधाकृष्ण विखे पाटील, दत्तात्रय भरणे उपस्थित होते.