MPSC Exam |पुणे पोलिसांनी एमपीएससी प्रश्नपत्रिका घोटाळ्यात चार जणांना अटक केली, रॅकेट परराज्यातून चालवलं जातं का?

Photo of author

By Sandhya


MPSC Exam Scam : एपीएससीकडून २ फेब्रुवारी घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र गट ब संयुक्त पूर्व परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतो, असे सांगत ४० लाखांची मागणी करणारी ध्वनिफीत नुकताच प्रसारित झाली होती. ही ध्वनिफीत प्रसारित झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. पुणे पोलिसांनी याची गंभीरपणे दखल घेत तपासही सुरु केला. मात्र, आता या प्रकरणाचे तार थेट मध्यप्रदेशपर्यंत असल्याचं पुढे आलं आहे.
याप्रकरणी पुणे पोलिसांनी आता मध्य प्रदेशच्या बालाघाटमधून एका २७ वर्षीय तरुणाला अटक केली आहे. दीपक यशवंत साकरे असं अटक करण्यात आलेल्या तरुणांचं नाव आहे. यापूर्वी पोलिसांना तिघांना अटक केली होती. साकरेच्या अटकेनंतर आता या प्रकरणात एकूण चार जणांना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणाचे धागेदोरे पोलिसांकडून तपासले जात आहेत. यातील मुख्य सुत्रधार एक महिला अधिकारी असल्याचे बोलले जात असताना मध्यप्रदेशमधून एकाला अटक केल्यानंतर हे रॅकेट परराज्यातून चालविले जात आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यापूर्वी पोलिसांनी योगेश सुरेंद्र वाघमारेला (२७ वर्षे) याला भंडारा जिल्ह्यातून अटक केली होती. तर आता दीपक यशवंत साकरेला (२७ वर्षे) मध्य प्रदेशच्या बालाघाटमधून अटक करण्यात आली आहे. या दोन्ही तरुणांनी काही विद्यार्थ्यांना फोन केल्याचे तपासातून निष्पन्न झाले आहे.

दरम्यान, याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची कसून तपास सुरु असून या प्रकरणात आणखी दोन आरोपी संशयित आहेत. त्यांचा शोध पुणे पोलिसांकडून घेतला जातो आहे. आशिष कुलपे आणि प्रदीप कुलपे फरार आरोपींची नावे आहेत.
भंडाऱ्यात अटक करण्यात आलेल्या योगेश वाघमारेला पुण्यात आणले असून त्याची चौकशी केली जात आहे. फरार आरोपी कुलपे बधुंची एक नातेवाईक महिला अधिकारी असून याप्रकरणाची मुख्य सूत्रधार तीच असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तिच्याच सांगण्यावरून या दोन्ही भावांनी हे कृत्य केले असल्याचे बोलले जात आहे.
पैसा कमावण्याच्या हव्यासापायी या महिला अधिकाऱ्याने या तरुणांना या कामी लावले असावे, असा संशय व्यक्त केला जातो आहे. याप्रकरणी आरोपींची चौकशी पूर्ण झाल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे. अशातच या प्रकरणात नेमके कोण कोण सहभागी आहे? यातून मोठा घोटाळा बाहेर येणार का? ती महिला अधिकारी नेमकी कोण आहे? या चर्चांना आता उधाण आले आहे.

Leave a Comment