Shirdi Crime News : शिर्डीमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या घटनांचे प्रमाण खूप वाढले आहे. आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शिर्डी साई संस्थानच्या तीन कर्मचाऱ्यांवर वेगवेगळ्या ठिकाणी अज्ञातांकडून चाकू हल्ला करण्यात आला आहे. यात दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून तिसऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार पहाटे हे कर्मचारी शहरातील वेगवेगळ्या भागांतून कामावर निघाले होते त्यावेळी अज्ञांतानी हा हल्ला केला. यात दोघे ठार झाले. तर तिसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.
शिर्डी परिसरात परत एकदा गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढू लागली आहे. वाळू तस्करी, अवैद्य धंदे ,मटका, जुगार, पाकीटमारी यातून मिळणाऱ्या दोन नंबर पैशातून गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीला वेळीच पायबंद घालणे गरजेच बनले आहे. पोलिसांची गुन्हेगारांवर जरब नसल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे.
दरम्यान शिर्डीतील एका तारांकीत हॉटेलमध्ये हैद्राबाद येथील एका भाविकानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी समोर आली. ही धक्कादायक घटना शिर्डीतील मारी गोल्ड हॉटेलमध्ये घडली. मरम रेड्डी अमरनाथ रेड्डी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आधी रूम बुक केली. नंतर शालच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
त्या व्यक्तीला गळफास घेतलेलं पाहताच हॉटेल मालकाने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. हैदराबाद येथील साई भक्तांनी आत्महत्या कुठल्या कारणामुळे केली? एकट्या ग्राहकाला रूम देऊ नये अशा प्रशासनाच्या सूचना असताना हॉटेल व्यवस्थापनाने रूम दिलीच कशी? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.