
घाटणे (ता. माढा): गावातील हरिभाऊ जानू लोंढे (वय ३५) यांनी गुरुवारी (दि. ६) गळफास लावून आत्महत्या केली. पतीच्या मृत्यूनंतर निराश झालेल्या त्यांच्या पत्नी जनाबाई लोंढे (वय ३२) यांनी ४ वर्षांच्या मुलीसह सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.ही घटना रविवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आली. एकाच कुटुंबातील तिघांनी आपले जीवन संपवल्याने गावात शोककळा पसरली आहे.
हरिभाऊ लोंढे यांनी गुरुवारी घरातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. त्यांच्या मृतदेहावर कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले.
अंत्यसंस्कारासाठी उशीर झाल्याने घरात नातेवाईक मुक्कामी होते. त्यानंतर पतीच्या मृत्यूनंतर समोर दुःखाचा डोंगर उभा राहिला होता. पोटच्या सहा मुलींचे पुढे कसे काय होणार याविचाराने हताश झालेल्या पत्नीने त्याच रात्री टोकाचे पाऊल उचलले. रात्री एकच्या सुमारास कोणालाही न सांगता ४ वर्षीय मुलगी साजरी हिला सोबत घेऊन घरातून निघून गेली.
पतीच्या मृत्यूनंतर प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या जनाबाई यांनी रात्री १ वाजता चार वर्षांच्या मुलीसह घर सोडले. नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी शोध घेतला, परंतु ते बेपत्ता असल्याने कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.
रविवारी गावातील मुलांना जानुबाई मंदिराजवळील सार्वजनिक विहिरीत मायलेकींचे मृतदेह तरंगताना दिसले. ग्रामस्थांनी पोलिसांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले आणि अंत्यसंस्कार केले. याप्रकरणी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.