शनिशिंगणापूर | शनिदेवाला सुट्या तेलाऐवजी ब्रँडेड तेलानेच करावा लागेल अभिषेक! शनिशिंगणापूर देवस्थानचा मोठा निर्णय

Photo of author

By Sandhya



शनिशिंगणापूर देवस्थानच्या नव्या नियमांनुसार, एक मार्चपासून भाविकांना फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी तेलानेच अभिषेक करता येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर हे श्रद्धेचे केंद्र मानले जाते. शनिदेवाच्या कृपेची प्राप्ती होण्यासाठी येथे हजारो भाविक तैलाभिषेक करण्यासाठी येतात. मात्र, शनिदेवाच्या स्वयंभू शिळेची झीज रोखण्यासाठी आता मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या बैठकीत एक मार्च २०२५ पासून फक्त ब्रँडेड आणि शुद्ध रिफायनरी खाद्यतेलानेच अभिषेक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे सुट्या तेला (नियमबाह्य तेल) वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तेलाची भेसळ थांबवण्यासाठी कठोर पावले
यापूर्वी अनेक भाविक वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यतेल, सुटे तेल किंवा मिश्रित तेल आणून अभिषेक करत असत. मात्र, अन्न व भेसळ तपासणी अहवालांनुसार असे आढळले की, काही तेलांमध्ये भेसळ असल्यामुळे शनिदेवाच्या मूर्तीवर परिणाम होत आहे. भेसळीच्या तेलामुळे मूर्तीच्या पृष्ठभागाची झीज वाढत आहे. त्यामुळे देवस्थान समितीने कठोर पावले उचलत फक्त नामांकित ब्रँडेड तेलच वापरण्याचा निर्णय घेतला आहे.
ग्रामसभा आणि देवस्थान समितीची अंतिम मान्यता-
या निर्णयावर ग्रामसभा व विश्वस्त मंडळाच्या बैठकीत सखोल चर्चा झाली. ग्रामस्थ, भक्तगण आणि तज्ज्ञ यांच्या मते, हा निर्णय आवश्यक आहे. यामुळे शनिदेवाची स्वयंभू मूर्ती सुरक्षित राहील आणि भाविकांनीही तेलाच्या गुणवत्तेची खात्री करूनच अभिषेक करावा, असा संदेश देण्यात आला आहे.
नियम मोडल्यास काय कारवाई होणार?
भाविकांनी सुट्या तेलाची बाटली आणल्यास अभिषेकास परवानगी मिळणार नाही. तसेच, अशा तेलाबाबत भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाकडे (FSSAI) तपासणीसाठी नमुने पाठवले जातील.जर भाविकांनी नियम मोडले, तर त्यांच्यावर देवस्थानकडून प्रशासनात्मक कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

You cannot copy content of this page